पृथ्वीपासून १५० प्रकाशवर्षे दूर अंतरावर वैज्ञानिकांनी गुरू ग्रहाच्या आकाराएवढे दोन बाह्य़ग्रह शोधून काढले आहेत, सौरमालेत लहान ग्रहांवर जीवसृष्टी शक्य आहे की नाही यावर या संशोधनातून प्रकाश पडणार आहे.
अमेरिकेत रिव्हरसाईड येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक स्टीफन कॅनी यांनी सांगितले की, हे ग्रह गुरू एवढे असून पृथ्वीवरील जीवसृष्टीची वाटचाल या शोधातून समजू शकेल. इतर किती ताऱ्यांभोवती असे गुरूएवढे ग्रह आहेत हे माहिती नसले तरी त्यांच्या वसाहतयोग्यतेबाबत यातून प्रकाश पडू शकतो. या ग्रहांवर महासागराच्या रूपात पाणी असू शकते शिवाय उल्का, धुमकेतू व लघुग्रह यांना त्यांच्या कक्षेतून बाहेर फेकण्याची क्षमताही असावी त्यामुळे तेथून सुटलेले हे घटक इतर लहान ग्रहांवर आदळले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या ग्रहांच्या ताऱ्याभोवती अनेक मोठे ग्रहही सापडले आहेत. असे असले तरी त्यांचा उपयोग आपल्याला सौरमालेच्या रचनेचे आकलन करून घेण्यासाठी फारसा होणार नाही कारण शनी, युरेनस व नेपच्यून हे सर्व ग्रह सूर्यापासून लांब अंतरावर आहेत. ताऱ्यांपासून दूर अंतरावर असलेले मोठे ग्रह सापडण्याचे प्रमाण अजून कमी आहे.
अॅस्ट्रॉनॉमिकल जर्नल या नियतकालिकात याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. यात पारंपरिक पद्धतींबरोबर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर या संशोधनात करण्यात आला आहे. एखादा ग्रह ताऱ्यासमोरून जातो तेव्हा दिसणाऱ्या प्रकाशाच्या फरकातून बाह्य़ग्रहांचा अंदाज केला जातो.