भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग पाच वर्षांच्या तळात गेल्याची आणि बेरोजगारीने गेल्या 45 वर्षांतील उच्चांक गाठल्याची परिस्थिती ताजी असताना देशाची अर्थचिंता वाढविणारी आणखी एक घटना घडली आहे. लाभार्थी विकसनशील देशाचा भारताचा दर्जा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढून घेतला असून व्यापार अग्रक्रम व्यवस्थेत (जीएसपी) आतापर्यंत दिल्या जाणाऱ्या व्यापार करसवलती रद्द केल्या आहेत.
बाजारपेठांत समान प्रवेश देण्याबाबत असलेल्या शंकांवर भारताने अमेरिकेला आश्वासित करण्यासाठी काहीच केले नसल्याने अखेर या सवलती काढून घेण्यात आल्या आहेत. अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनी या निर्णयाला विरोध केला असतानाही ट्रम्प यांनी ही घोषणा केली. त्यामुळे कित्येक भारतीय उत्पादनांना अमेरिकेत कर भरावा लागणार असून त्याचा फटका येथील उद्योजकांना बसणार आहे.