भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित डोवाल यांना कायम ठेवण्यात आले असून त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. डोवाल यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेमध्ये डोवाल यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
2014 साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकच्यावेळी रणनीती आखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1968 सालाच्या बॅचचे IPS अधिकारी डोवाल यांनी ‘IB’मध्ये अनेक वर्षे सेवा केली आहे. ‘IB’चे प्रमुखपदही त्यांनी सांभाळले आहे. 1988 साली त्यांना ‘कीर्ती चक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले पोलीस अधिकारी आहेत.