संपूर्ण देशात सव्वा लाख ‘डिजीटल व्हिलेज’ करण्यात आले आहेत. आगामी पाच वर्षांमध्ये आणखी एक लाख ‘डिजीटल व्हिलेज’ तयार करण्याचे मोदी सरकारचे नियोजन असल्याची माहिती मानवसंसाधन विकास, दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली.
केंद्रीय मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर संजय धोत्रे यांचे प्रथमच अकोल्यात आगमन झाले. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. तंत्रज्ञान अंत्यत प्रगत झाले. त्याचा उपयोग करून घेण्यावर अधिक भर आहे. या माध्यमातून तळागाळात सोयीसुविधा पुरवून विकास केला जाऊ शकतो. त्यामुळे पुढील पाच वर्षांमध्ये आणखी एक लाख ‘डिजीटल व्हिलेज’ तयार करण्यात येतील.
लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार मोठय़ा प्रमाणात ‘रालोआ’सोबत राहिला. अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. आधीच्या सरकारपेक्षा सरस कामगिरी करून प्रत्येकासाठी कार्य केल्याने ऐवढा मोठा विजय प्राप्त झाला. देशातील बहुतांश राज्यांमध्ये भाजपला मोठय़ा प्रमाणात जागा मिळत असतात. यावेळेस बंगालमधील यश उल्लेखनीय असल्याचे संजय धोत्रे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्ष नेतृत्वाने अत्यंत तीन महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी सोपवली आहे. त्या खात्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. अकोल्याचा विचार केल्यास केंद्रीय विद्यालय, विद्यापीठाचे उपकेंद्र आदींसाठी प्रयत्न राहील, असेही संजय धोत्रे यांनी सांगितले. यावेळी आमदार सर्वश्री गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे, डॉ.संजय कुटे, रणधीर सावरकर, गोपीकिशन बाजोरिया, अॅड. आकाश फुंडकर आदी उपस्थित होते.