केंद्र सरकारने कॅबिनेट सचिव या पदासाठी 60 वर्षे जुना नियम बदलला आहे. कॅबिनेट सचिव प्रदीप कुमार सिन्हा यांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यासाठी 60 वर्षे जुना ‘अखिल भारतीय सेवा (मृत्यू-नि-सेवानिवृत्ती लाभ) अधिनियम-1958’ हा नियम बदलला आहे.
कॅबिनेट सचिव पदाचा कार्यकाळ 2 वर्षापर्यंत असतो. जुन्या नियमानुसार सरकार कॅबिनेट सचिवांना सेवा वाढ देऊ शकते. पण, त्यांचा कार्यकाळ हा 4 वर्षापेक्षा जास्त नसावा. प्रदीप कुमार सिन्हा आपला 4 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. त्यामुळे कारणास्तव सरकारने हा नियम बदलला आहे.
नव्या नियमानुसार केंद्र सरकार 4 वर्षानंतर कॅबिनेट सचिवांना किमान 3 महिन्यांपर्यंत कार्य विस्तार देऊ शकते. त्यानुसार आता कॅबिनेट सचिव प्रदीप कुमार सिन्हा यांना 3 महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे प्रदीप कुमार सिन्हा आता कॅबिनेट सचिव पदावर सर्वात जास्त काळ काम करणारे अधिकारी म्हणून ओळखले जाणार.
कॅबिनेट सचिव हे नोकरशाहीतले सर्वात महत्त्वाचे पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे असे हे पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि कॅबिनेट सचिव यांच्याकडे PMOमधील सर्वात प्रभावशाली चमू म्हणून पाहिले जाते. प्रदीप कुमार सिन्हा यांना तिसऱ्यांदा सेवा वाढ देण्यात आली आहे.
सिन्हा यांना 2015 साली कॅबिनेट सचिव पदावर नियुक्त करण्यात आले होते. सन 2017 ते सन 2018 या काळात सिन्हा यांना एक वर्षाचा कार्यकाळ वाढवून देण्यात आला.