भारत, रशिया आणि चीन या देशांची त्रिपक्षीय बैठक या महिनाअखेरीस होणार आहे. जपानमध्ये होत असलेल्या ‘जी-२०’ सदस्यदेशांच्या परिषदेच्या निमित्ताने ही बैठक होणार आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन हे सहभागी होतील, असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले.
किर्गिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये होत असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेच्या निमित्ताने चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग तसेच रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्याशी पंतप्रधान मोदी यांच्या स्वतंत्र भेटीगाठी झाल्या. त्या वेळी परस्पर संबंध अधिक दृढ करण्याचा निर्णय घेतला गेला. याच चर्चेतून त्रिपक्षीय बैठकीचा विचार पुढे आल्याचे समजते.
दहशतवादाच्या मुद्दय़ावर आणि विशेषत्वाने मसूद अझरप्रकरणी रशियाने नेहमीच भारताची पाठराखण केली आहे. चीनने मात्र आतापर्यंत नकाराधिकाराचा वापर करून भारताची कोंडी केली होती. या वेळी प्रथमच रशियाने चीनचे मन वळविण्याचा प्रयत्न केल्यानंतर चीनने मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास आडकाठी केलेली नाही.
सध्या अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारयुद्ध भडकत आहे. भारताच्याही अनेक र्निबधांबद्दल अमेरिकेने कठोर पवित्रा घेतला आहे. त्यामुळे भारत आणि चीनच्या संबंधांमधील सकारात्मक बदलांना महत्त्व आले आहे. आता त्रिपक्षीय बैठकीत दहशतवादविरोधी लढा तसेच आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या दिशेने चर्चा होण्याची शक्यता आहे.