अंतराळामध्ये स्वत:चे अंतराळ स्थानक स्थापन करण्याची तयारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याने केली आहे. भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘गगनयान मिशन’ याचाच हा विस्तार असेल. भविष्यातील अंतराळ संशोधनातील विविध मोहिमेसाठी भारताला स्वतःचे अंतराळ स्थानक असल्याचा मोठा फायदा होऊ शकतो. सध्या अंतराळात दोनच स्थानके आहेत. एक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक तर दुसरे चीनचे स्वतःचे अंतराळ स्थानक आहे. या पंक्तित भारताचे स्थान असेल, असा दावा करण्यात आला आहे.
योजनेनुसार, ISROचे अंतराळ स्थानक खूपच लहान असणार आहे, जे मायक्रोग्रॅव्हीटी संबंधी प्रयोग करण्यासाठी वापरले जाईल. अंतराळ स्थानकाचे वजन 20 टन असणार. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ISROला 5 ते 7 वर्षांचा कालावधी लागू शकतो. शिवाय भारत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातल्या जगातल्या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय सहकारी कार्यक्रमात सहभागी होणार नाही असे ISRO कडून जाहीर करण्यात आले. ISS हा युरोपीय संघ, अमेरिका, जपान, कॅनडा आणि रशिया यांचा भागीदारी कार्यक्रम आहे.