महाराष्ट्र, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीवरील तेलंगाणामधील जयशंकर भूपलपल्ली जिल्ह्यातील मेडीगड्डा येथील जगातील सर्वात मोठ्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पाचे आज लोकार्पण झाले. ८० हजार कोटी खर्चून उभारलेल्या या मेगा जलसिंचन प्रकल्पाचे उदघाटन तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते झाले.
कालेश्वरम सिंचन प्रकल्पाची उभारणी विक्रमी वेळेत केली असून याद्वारे गोदावरीचे १३ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी लिफ्टद्वारे उचलले जाणार आहे. हे पाणी उचलण्यासाठी जमिनीखाली १४.०९ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला आहे. तर यामुळे ४५ लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पामुळे हैदराबाद शहरातील एक कोटी लोकांना पिण्याचे आणि तेलंगाणातील उद्योगांना १६ टीएमसी पाणी मिळणार आहे.