जागतिक आरोग्य संघटना (WHO) याच्या “E-2020 इनिशीएटिव्ह: 2019 प्रोग्रेस रीपोर्ट” या अहवालानुसार, आशिया खंडातल्या चीन, इराण, मलेशिया आणि तिमोर-लेस्ते या चार देशांमध्ये तसेच मध्य अमेरीका उपखंडातला एल साल्वाडोर या देशांमध्ये 2018 साली मलेरीयाचे एकही प्रकरण नोंदविले गेलेले नाही. चीन आणि एल साल्वाडोर या देशांमध्ये सलग द्वितीय वर्षीही मलेरीयाची शून्य प्रकरणे नोंदवली गेली. तर अन्य तीन देशांची याबाबतीत प्रथमच नोंद करण्यात आली आहे.
संक्रमित डासांच्या चाव्यामुळे मलेरीया हा आजार होतो. मृत्युला कारणीभूत ठरणारा जगातला अग्रगण्य आजार म्हणून मलेरीयाची ओळख आहे. 2017 साली 87 देशांमध्ये अंदाजे 219 दशलक्ष प्रकरणे नोंदवली गेली आणि 400,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. जगभरात आढळून आलेल्या मलेरीयाच्या एकूण प्रकरणांमध्ये जवळपास 50% भारत (4%), नायजेरिया (25%), काँगो (11%), मोजांबिक (5%), आणि युगांडा (4%) या केवळ पाच देशांमध्ये नोंदविली गेली.
सर्व देशांमध्ये, केवळ भारतातच 2016 सालाच्या तुलनेत 2017 साली मलेरीयाच्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक 24 टक्क्यांनी घट झाली. सन 2015 मध्ये जागतिक आरोग्य सभेनी 2030 सालापर्यंत मलेरीयाच्या निर्मूलनासाठी ‘ग्लोबल टेक्निकल स्ट्रॅटजी फॉर मलेरीया 2016-2030’ हे धोरण मंजूर केले. त्यामधून कमीतकमी 10 देशांमधून मलेरीयाचे उच्चाटन करण्यासाठीचे लक्ष्य ठेवले गेले. 2016 साली प्रकाशित झालेल्या WHOच्या विश्लेषणानुसार, 20 देशांनी 2020 सालापर्यंत मलेरीयाचे उच्चाटन करण्याची क्षमता दर्शविली. जून 2018 मध्ये, पराग्वे हे प्रथम देश होते जे E-2020 समुहामध्ये मलेरीया-मुक्त असल्याचे प्रमाणित केले गेले. तर मे 2019 मध्ये अल्जेरीया आणि अर्जेंटिना यांना मलेरीया-मुक्त घोषित केले गेले होते. शिवाय या उपक्रमाचे सहभागी नसलेले उझबेकिस्तान आणि अर्जेंटिना या देशांना देखील अनुक्रमे सन 2018 आणि सन 2019 मध्ये मलेरीया-मुक्त म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले.