पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती बनले आहेत. ब्रिटीश हेराल्ड २०१९ च्या सर्वेक्षणात व्लादिमीर पुतीन, डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकून मोदींनी बाजी मारली आहे. ब्रिटीश हेराल्डने जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती निवडण्यासाठी वाचकांचा पोल तयार केला होता. या नामांकनाच्या यादीत जगातील २५ प्रभावशाली व्यक्तींचा समावेश केला होता. अखेरच्या टप्प्यात समीक्षकांसमोर चार उमेदवारांची नावं ठेवण्यात आली.
या चार जणांच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची नावे होती. ज्यामध्ये या सर्वांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नंबर पटकावला. या निवड प्रक्रियेचं मुल्यांकन मतांची आकडेवारी, व्यापक संशोधनच्या आधारावर करण्यात आले आहे.
ब्रिटीश हेराल्डने वाचकांना मोस्ट पॉवरफुल पर्सन २०१९ साठी मते नोंदवायला एक ओटीपी दिला होता. ज्यामुळे एका व्यक्तीला एकापेक्षा अधिक मते देणं शक्य नव्हतं. शनिवारी मतदानाची प्रक्रिया थांबली. नरेंद्र मोदी यांची जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून निवड झाल्यानंतर ब्रिटीश हेराल्डच्या कव्हर पेजला मोदींचा फोटो झळकणार आहे. 15 जुलै रोजी ब्रिटीश हेराल्डची पत्रिका प्रकाशित होईल.