भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी जपानच्या ओसाका या शहरात जी-20 परिषदेच्या दरम्यान भेट घेतली. दोन्ही देशांमधील द्वैपक्षीय व्यापार 2025 सालापर्यंत 50 अब्ज डॉलरपर्यंत पोहचविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अर्थव्यवस्था, संरक्षण आणि सागरी सुरक्षा यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याला चालना देण्यावर चर्चा केली गेली.
इंडोनेशिया हा आग्नेय आशिया व ओशनियामधील एक देश आहे. हा देश हिंद महासागरातील 17,508 बेटांचा एक द्वीपसमूह आहे. जकार्ता ही देशाची राजधानी आहे आणि इंडोनेशियन रुपिया हे राष्ट्रीय चलन आहे. भारतीय व चिनी संस्कृतीचा मिलाफ येथे दिसून येतो. या देशाचा भारताशी पुरातन संबंध आहे. भारतातल्या पुराणांमध्ये याचा उल्लेख दीपांतर भारत म्हणजेच समुद्रापारचा भारत असा आढळतो. दीपांतर हे नाव इंडोनेशिया मध्ये अजूनही प्रचलित आहे.
इंडोनेशियाच्या केंद्रीय सांख्यिकी संस्थेनुसार, भारतासोबतचा व्यापार 2016 साली 12.90 अब्ज डॉलर झाला. सन 2017 मध्ये दोन्ही देशांचा द्वैपक्षीय व्यापार 28.70% ने वाढून 18.13 अब्ज डॉलरवर पोहचला आहे.