विज्ञान संशोधनातील गुंतवणुकीत चीनने आक्रमक धोरण ठेवले असून तुलनेने भारतात ‘लालफितीचा कारभार’ असल्याने अनेक अडचणी येत आहेत त्यात वैज्ञानिक व सरकार यांच्यात पुरेशा संपर्काचा अभावही आहे, अशी टीका नोबेल विजेते वैज्ञानिक क्लॉस व्हॉन क्लिटझिंग यांनी केली आहे.
संशोधन व विकास यात चीन हा अमेरिकेखालोखाल जास्त खर्च करीत आहे, असे अमेरिकेच्या ‘नॅशनल सायन्स फाउंडेशन व नॅशनल सायन्स बोर्ड’ या दोन संस्थांनी दिलेल्या माहितीतून २०१८ मध्ये दिसून आले आहे.
१९८५ मध्ये ‘इंटिगर क्वांटम हॉल इफेक्ट’च्या शोधासाठी नोबेल मिळवणारे क्लिटझिंग यांनी सांगितले की, भारत व चीन हे जगातील दोन मोठे उदयोन्मुख देश आहेत पण संशोधन क्षेत्राचा विचार करता चीन जास्त आक्रमक आहे. संशोधन क्षेत्रात त्यांची गुंतवणूक मोठय़ा प्रमाणात आहे. चिनी अर्थव्यवस्थेचा भर हा विज्ञान व नवप्रवर्तनावर आहे. पायाभूत सेवा व विकास यात त्यांची गुंतवणूक खूप मोठी आहे.
६८ व्या लिंडाव नोबेल मानकरी परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, वर्षभराच्या कुठल्याही कालावधीचा विचार करता चीनने भारतापेक्षा अधिक पेटंट नोंदवले आहेत. शिवाय त्यांच्या शोधनिबंधांची संख्याही जास्त आहे.