पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्रीपदाचा कारभार हाताळण्यापूर्वी राखलेल्या खात्याकरिता अधिक तरतूद करण्याचे पाऊल निर्मला सीतारमण यांनी उचलले आहे. संरक्षण खात्याकरिता यंदा 3.18 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यंदा ती जवळपास 8 टक्क्य़ांनी वाढविण्यात आली आहे. यंदा करण्यात आलेल्या तरतुदीव्यतिरिक्त 1.12 लाख कोटी रुपये हे निवृत्तीवेतनाकरिता स्वतंत्र राखून ठेवण्यात आले आहेत.
निवृत्ती वेतन धरून संरक्षण खात्यासाठीची एकूण तरतूद चालू वर्षासाठी 4.31 लाख कोटी रुपये होत आहे. केंद्र सरकारच्या 2019-20 मधील एकूण भांडवली खर्चाच्या तुलनेत हे प्रमाण 15.47 टक्क आहे. गेल्या वित्त वर्षांत संरक्षण खात्याकरिता 2.98 लाख कोटी रुपयांची तरतूद होती. वाढविण्यात आलेल्या रकमेपैकी 1.08 लाख कोटी रुपये हे नवीन शस्त्रखरेदी, सैन्य दलाकरिता उपकरण आदींसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. वेतन, देखभाल आदींसह एकूण महसुली खर्च 2.10 लाख कोटी अपेक्षित करण्यात आला आहे.