शहरी ग्रामीण त्याचबरोबर आदिवासी समुदायातील तरुणांना जोडुन घेण्याची आणि शाश्वत काम उभारण्याची संकल्पना डॉ प्रभा तिरमारे यांनी टीम परिवर्तनच्या युवक मंडळीसमोर मांडली आणि युवकांच्या आंतरराष्ट्रीय ज्ञान समुदायाची सुरुवात झाली. या युवकांचे पहिले निवासी शिबीर गेल्या वर्षी साद फाउंडेशनच्या मदतीने बेडीसगाव वांगणी येथे पार पडले. युवकांमध्ये असलेले ज्ञान आणि माहितीचे संवर्धन व्हावे त्यांच्या क्षमता आणि कौशल्यांचा विकास व्हावा आणि परिवर्तनशील विकासासाठी युवकांना योग्य दिशा मिळावी या उद्देशाने टीम परिवर्तन या युवकांच्या गटाने हे शिबीर यावर्षी दि वात्सल्य फाउंडेशनच्या मदतीने झाडघर मुरबाड येथे आयोजित केले होते. सध्याची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा युवकांनी अभ्यास करावा विचारांचे आदानप्रदान व्हावे आणि त्यांतून स्थानिक पातळीवरील सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा या हेतुने अनेक युवक या शिबिरास उपस्थित होते. शिबीरात उमाकांत चौधरी यांनी सामाजिक कामांत युवकांची भूमिका तर योगेंद्र बांगर यांनी आजीबाईची शाळा ही अभिनव संकल्पना युवकांसमोर मांडली त्याचबरोबर महेंद्र पाटील यांनी दि वात्सल्य फाउंडेशचे ग्रामीण भागांतील काम आणि ग्रामीण परिस्थिती आपल्या मनोगतात सांगितली.
देशभर कुठेही गेलो तरी एक गोष्ट आपल्या लक्षांत येते ती म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागांत असलेली प्रचंड तफावत मग ती कोणत्याही बाबतीत असो मूलभूत प्रश्न असोत किंवा इतर सुखसोयी. हीच तफावत नेमकी काय आहे यांचा उगम नेमका कसा झाला, यामागील कारणे, त्यांचे होणारे परिणाम त्याचबरोबर सध्याची परिस्थिती हे समजावुन घेत ह्या संपूर्ण प्रक्रियेत मला काही करता येईल का किंवा किमान माझ्या ज्ञानात काही भर पडेल का यासंदर्भात डॉ. प्रभा तिरमारे यांनी युवकांशी चर्चा केली. युवकांना आपल्या अस्तित्वाची जाणीव व्हावी त्यांनी स्वतःला शोधावे यांसाठी सुमिता यांनी शिबिरात मार्गदर्शन केले. निराधार मुलांचा प्रश्न पसायदान बालभवनचे बबन शिंदे यांनी अत्यंत समर्पक पद्धतीने युवकांसमोर मांडला. जातपंचायतीचे सद्यस्थितीतील वास्तव अक्षय तमायचेकर तर कायद्याने वागा लोकचळवळीची आवश्यकता राकेश पद्माकर मीना यांनी स्पष्ट केली. टीम परिवर्तनच्या विविध उपक्रमांची माहिती शिबीरात देण्यात आली त्यांत अंघोळीची गोळी ही पाणी बचतीची संकल्पना सागर वाळके आणि चेतन पाटील तर खिळेमुक्त झाडं वृक्ष संवर्धन अभियानाची गरज तुषार वारंग यांनी स्पष्ट केली एकलव्य- गावं तिथे ग्रंथालय ही वाचनसंस्कृती समृद्ध करणारी संकल्पना आणि अंधश्रद्धा निर्मुलन या विषयांवर स्वप्नील शिरसाठ यांनी युवकांशी संवाद साधला.
ग्रामीण शहरी भागांतील दूरी समजावुन घेण्यासाठी नाळ हे सामाजिक शिबीर नक्कीच उपयोगी ठरेल आणि अनेक तरूण सामाजिक कार्यात आपले योगदान देण्याचा प्रयत्न करतील असा विश्वास शिबीर समन्वयक अविनाश पाटील यांनी व्यक्त केला. शिबीराचे संपूर्ण नियोजन अनिकेत चांदूरे, निलेश पाटील आणि रुपाली वाघूडें यांनी केले. शिबीर नियोजनात विशेष सहकार्य करणारे अतुल पाटील, निखिल लाड, संजीव साळी, अनिकेत बारापात्रे, गायत्री सहाणे यांचे देखील टीम परिवर्तनच्या वतीने आभार यावेळीं व्यक्त करण्यात आले.