परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (पूजनीय दादा) यांच्या प्रेरणेने स्वाध्याय परिवारातील युवा वर्ग श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करतो. भगवान श्रीकृष्णाची जयंती केवळ दहीहंडी फोडून न करता त्याचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावे या करता दादांनी युवकांना पथनाट्याची संकल्पना दिली. गेल्या १८ वर्षांपासून पूजनीय दादांची सुपुत्री व स्वाध्यायाची धुरा सांभाळणाऱ्या सौ. धनश्री श्रीनिवास तळवलकर (दीदी) यांच्या मार्गदर्शनाने पथनाट्याच्या माध्यमातून लाखो युवक देशविदेशात हे विचार घेऊन जात आहेत.
यंदा देशभरातील १६ राज्यांत तसेच विदेशातील इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आखाती देश या ठिकाणीही युवकांच्या जवळपास १५,००० टीम्स म्हणजे दीड लाखांहून अधिक युवक ‘एक भुलक्कड, कौन? ..’ या पथनाट्यातून सर्वांना विचार करण्यास प्रवृत्त करणार आहेत. विविध भाषांमधून ही पथनाट्ये १६ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट, २०१९ या काळात सादर करण्यात येतील. विशेष म्हणजे कोणत्याही प्रलोभनाशिवाय आपलं शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून व या सर्वातून वेळ काढून हे युवक पथनाट्य सादर करणार आहेत. आज ‘आम्हांला असं वेगळं काही करायला वेळच नसतो’ असं जिथे जागोजागी ऐकू येतं त्याच वयोगटातील हे युवक हा उपक्रम करणार आहेत हे विशेष. गतवर्षी म्हणजे २०१८ साली स्वाध्याय परिवाराच्या युवकांच्या साधारण १४,५०० टीम्सनी जवळपास ६२,००० ठिकाणी ही पथनाट्ये केली होती व साधारण ५४ लाख लोकांनी ही पथनाट्ये पाहिली होती.
आज आपण आपल्याच आयुष्यात इतके मग्न असतो की बऱ्याचदा कुटुंब, समाज, देश व प्रत्यक्ष भगवंत या सर्वांचे आपल्यावरील ऋणच विसरतो. माणसाच्या मूलभूत गुणांपैकी असायला हवा असा ‘कृतज्ञता’ हा गुण जणु विस्मरणातच जातो आहे अशी आजच्या समाजाची स्थिती आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या प्रगत युगात स्मरण ठेवण्याची अनेक साधने उपलब्ध असतानाही सर्वांचे आपल्यावरील ऋण काहीसे विसरलेल्या, forgetful, विसराळू झालेल्या माणसाची थोडक्यात कहाणी सांगणारे हे नाटक आहे.
भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवत् गीतेत सांगितलेले विचार इतके प्रभावी आहेत की ते जीवनात साकार झाल्यास व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र असा उत्तरोत्तर विकास शक्य आहे. मात्र हे प्रभावी विचार तरुणांना मिळत नाहीत, तरुणांपर्यंत पोहोचतच नाहीत. कृष्णाचे विचार मिळाले तर आजचा युवान देखील केवळ स्वार्थी न होता एक उन्नत, कृतज्ञ जीवन जगू शकतो असेच काहीसे विचार या पथनाट्यातून पाहायला मिळणार आहेत.
दहीहंडीची उंची व थर यावरच बाष्कळ चर्चा व वादंग करताना आपण श्रीकृष्णाची, त्याच्या विचारांची आणि दहीहंडीच्या उत्सवाची ‘उंची’ किती खुजी ठरवतोय याचं भानच समाजात कोणाला राहिलेलं नसताना स्वाध्याय परिवाराच्या युवकांची जन्माष्टमी निमित्त सादर होणारी ही पथनाट्ये आशेचा एखादा किरण फुलवू शकतील हे नक्की !! वर्ष २०१९-२० हे पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यामुळे या वर्षीच्या सादरीकरणामध्ये युवकांचा एक विशेष उत्साह असेल हे नक्की! अर्थात यावर्षी देशातील अनेक भागातील भीषण पूरपरिस्थिती लक्षात घेऊन व तेथील देशवासीयांविषयी संपूर्ण संवेदना ठेवून अशा पूरग्रस्त विभागात ही पथनाट्ये स्वाध्याय परिवारातर्फे यावर्षी साजरी करण्यात येणार नाहीत.
– संतोष राजदेव, प्रतिनिधी