अल्पशा कारकिर्दीत महाराष्ट्राच्या राजकारण आणि प्रशासनावर कणखर निर्णयांची एक ठाम मुद्रा उमटविणारा मुख्यमंत्री म्हणजे सुधाकरराव नाईक. यवतमाळ जिल्ह्यातील गवली या छोट्याशा गावात २१ ऑगस्ट १९३४ रोजी सुधाकररावांचा जन्म झाला. त्यांच्या राजकारणाची सुरुवात सरपंच ते मुख्यमंत्री अशी अद्वितीय राजकीय सफर त्यांनी केली. पाण्याच्या संदर्भात महाराष्ट्र स्वयंमपूर्ण असावा असे त्यांना वाटत. “पाण्यासाठी वेळीच उपाययोजना जर केल्या नाही तर या महाराष्ट्राला वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही.” असे ते म्हणत.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मूलमंत्राचा संदेश देत सुधाकररावांनी महाराष्ट्र ‘सुजलाम् सुफलाम्’ तर केलाच पण त्याचबरोबर राज्यात मोठी जलक्रांती घडवून आणली. दुष्काळ आणि पाणी टंचाईने होरपळणारया महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी त्यांनी राज्यात जलक्रांतीची बिजे रोवली. स्वतंत्र जलसंधारणाच्या कामांत गती देत राज्याला जलसमृद्ध केले. पाणलोट क्षेत्रात विकास हे नवे सूत्र नाईकांनी प्रभावीपणे वापरले. त्यातूनच जलसंधारण हे खाते निर्माण केले. त्यामुळे छोटे बंधारे व पाझर तळाव निर्मितीस चालना मिळाली. महाराष्ट्रात विनाअनुदानीत तत्वावर अभियांत्रिकी महाविद्यालय उघडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पाहता पाहता महाराष्ट्रात तंत्रशिक्षणाची क्रांती घडून आली. जोपर्यंत मुलगी शिकणार नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही हे ते जाणून होते म्हणून त्यांनी मुलींचे शिक्षणशुल्क माफ करण्याचे ठरविले. महिला आणि बाल सुरक्षेचा प्रश्न पाहता त्यांनी स्वतंत्र महिला व बालकल्याण या विभागाची स्थापना केली. जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला. त्यामुळे त्यांची संपूर्ण देशभरात प्रशंसा झाली.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी मुंबईतील माफियाराज संपवून भूखंड माफियांना कठोर शिक्षा देवून त्यांना गजाआड केले. विशेषतः गुंड प्रवृत्तीच्या राजकारणी लोकांना त्यांनी चांगलाच धडा शिकवला. हाजी मस्तान, दाऊद इब्राहिम, पपू कलानी, छोटा राजन, अरुण गवळी त्यांच्यावर कडक कारवाई करत त्यांचे विच्छेदन केले यामुळे ते गुंडांसाठी करर्दणकाळ ठरले आणि जनमाणसात त्यांची प्रतिमा अधिक उंचावली. मुख्यमंत्रीपदाचा कार्य संपल्यानंतर ते काही वर्षे हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. त्यांच्या सरळ आणि स्वच्छ राजकारणाची छाप आजही महाराष्ट्रात कायम आहे. महाराष्ट्र शासन सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतिदिनाला जलसंधारण दिन म्हणून साजरा करते. अशा या जीगरबाज नेत्याला शतशः सलाम आणि भावपूर्ण आदरांजली!
– रवी चव्हाण