एकटी दुपार संध्येची वाट पाहताना
बेफिकीर पसरून तलाव तुला धुंद करताना
निर्लज्ज पाणी तुझ्या ओठांशी खेळताना
दगडाचा आधार हळूहळू सुटताना
खोल पाण्यात तुझ्या हातांवर विसावताना
पाण्याची भीती तुझ्या डोळ्यात हरवताना
तुझ्या अनोळखी स्पर्शात ओळखीचा विश्वास सापडताना
तू ये, पुन्हा ये, म्हणजे पाऊस येईल
थंडी डाव साधेल, माळ मोकळा होईल
उघड्या डोळ्यांना लख्ख जगाचा विसर पडेल
दगडांच्या आडून, पाण्याच्या आत, स्वर्ग सापडेल
डोळे मिटून घ्यायला नकोत,
तू हरवलीस मग?
तरी मिटले…
काही अनुभवायचं होतं
काही आजमावून पाहायचं होतं
कुठे तरी हरवून जायचं होतं
तुझ्या जाळ्यात सापडायचं होतं
आणि तू हरवलीस..
म्हणून सांगतो, ये..
पुन्हा ये..
– मृगा वर्तक