वाडा… अशी एक वास्तू जी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे वैभव होती. पुर्वीच्या काळात महाराष्ट्रात वाडा संस्कृती ही सर्रास आढळत होती. आपल्यापैकी अनेकांना या वाड्यामध्ये राहण्याचा अनुभव देखील असेल. संस्कृतीचे शहर अशी ओळख असलेल्या पुण्यासह महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये ही निवारा पद्धत आढळत होती. वाड्याच्या दर्शनी भागी मधोमध एक चौक, त्या चौकाच्या मध्यभागी तुळशी वृंदावन, अंगण, पुढे आणि मागे एक दोन मजली इमारती अशी रचना असलेल्या या वाड्यामध्ये अनेक कुटुंब पिढ्यानपिढ्या वास्तव्यास होती. काही वाड्यांना तर चौफेर ओसऱ्या असायच्या.
जसजसे मनुष्याचे जीवनमान सुधारत गेले, तसतशी त्याला शहराच्या दिशेने ओढ वाटू लागली. वाड्यामध्ये गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या लोकांनी स्वतंत्र निवाऱ्याला प्राधान्य दिले आणि कालांतराने फ्लॅट संस्कृतीच्या झळाळीमागे ‘वाडा संस्कृती’ कालबाह्य होत गेली. ओस पडलेल्या वाड्यांच्या जागी त्यानंतर बांधकामांना सुरुवात झाली. मात्र अशा या ‘वाडा संस्कृती’ला जपण्याचा आणि जगवण्याचा प्रयत्न केला आहे तो नितीन ढेपे यांनी. पुण्यात ‘ढेपेवाडा’ या वास्तूद्वारे ते आजच्या पिढीला वाडा संस्कृतीची खऱ्या अर्थाने ओळख करुन देण्याचा प्रयत्न करतात. आजच्या पिढीला वाडा संस्कृतीचा परिसस्पर्श अनुभवता यावा, या जाणीवेतून नितीन ढेपे यांनी ‘ढेपे वाडा’ उभारला आहे