विक्रम लँडरचा संपर्क २.१ कि.मी.वर तुटला, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सीवन यांनी दिली. रात्री एक वाजून ४५ मिनिटांनी विक्रम लँडरने चंद्रावर उतरण्यास सुरुवात केली. इस्रोच्या शास्त्रज्ञांसह संपूर्ण देशातील जनता ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी सज्ज झाले होते. एक वाजून ५३ मिनिटांनी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार होते.
मात्र, चांद्रयान अवघे २.१ कि.मी.वर असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला आणि शास्त्रज्ञांबरोबरच संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला. यावेळी उपस्थित असलेल्या यांनी शास्त्रज्ञांना धीर दिला. जीवनात चढ-उतार येत असतात. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही विज्ञानाची आणि पर्यायाने देशाची सेवा केली आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. गेल्या तीन वर्षांपासून या मोहिमेसाठी खडतर मेहनत घेतली आहे. आतापर्यंत तुम्ही यशस्वी कामगिरी केली आहे. धीर सोडू नका. संपर्क तुटला म्हणून खचून जाऊ नका. तुम्ही केलेले काम छोटे नाही.
विक्रम लँडरकडे २.१ कि.मी. पर्यंतचा डेटा उपलब्ध आहे. त्याचा अभ्यास केला जाईल. संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती ‘इस्रो’कडून देण्यात आली. दरम्यान, पृथ्वीपासून तीन लाख ८४ हजार किलोमीटर दूर चांद्रभूमीवरील धुरळा उडवत ‘विक्रम लँडर’ चंद्रावर कसा उतरतो आणि आजवर कोणताही देश न पोचलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ भागात भारतीय तिरंगा कधी फडकतो याची उत्सुकता आणि चर्चा शुक्रवारी दिवसभर होती.
‘चांद्रयान-२’चा चंद्राच्या दिशेने प्रवास २२ जुलैला सुरू झाला असून, आतापर्यंतचे सर्व टप्पे व्यवस्थित पार पडले आहेत. या मोहिमेतील अचूकतेद्वारे भारताने अवकाश तंत्रज्ञानातील आपल्या क्षमतेचे दर्शन साऱ्या जगाला घडविले आहे. सन २०१६ मध्ये रशियाने लँडर देण्यात असमर्थता दर्शवल्यावर तीन वर्षांच्या विक्रमी काळात ‘इस्रो’ने स्वदेशी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर लँडर आणि रोव्हर विकसित केले.
‘चांद्रयान-२’च्या रूपाने इस्रोने भारतीय भूमीवरून आतापर्यंतचे सर्वाधिक वजनाचे यशस्वी प्रक्षेपण केले आणि कोणताही अनुभव नसताना पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने लँडर आणि रोव्हरला चांद्रभूमीवर उतरवण्यासाठी प्रयत्न केले. चंद्रापासून ३५ किमी अंतरावर असलेले ‘विक्रम लँडर’ १५ मिनिटांत चंद्रस्पर्श करील. या प्रक्रियेला ‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी ‘१५ मिनिटांचा थरार’ असे संबोधले.