गणपती बाप्पा अन् माझ्याकडे
बस्स! आनंद-समाधानासाठी नुसती ही भावनाच पुरेशी आहे. तु यायच्या आधीची भान-आतुरता आजही आठवतेय.नंतर तु आलास आणि तदनंतरचा प्रत्येक दिवस तुझ्यामुळे मंगलमय झाला,तुझ्या येण्याने आनंद व हर्षोल्हासासहीत दिवस कसे गेले हे कळलं सुद्धा नाही.सुखात व तु दिलेल्या आनंद नामक प्रसादात आम्ही इतके काही गर्क झालो की ,तुझी निघून जाण्याची वेळ अक्षरशः तोंडावर आली,तरी देखील आम्हाला कळलं नाही.येणा-या हरऐक सुखांच्या मागे केवळ बाप्पा तुच असतोस,हे समजायला आम्हाला थोडं जड जाते.सुखाच्या क्षणी इतकं त्या सुखात आम्ही दंग असतो की,ते सुख बाप्पा तु दिलंयस,तुझ्यामुळे मिळतंय,तुझ्यामुळे उपभोगतोय,हेही आमच्या ध्यानात येत नाही.
शेवटी चाललास न बाप्पा,जरुर जा!आम्ही फार फार तर निरोपगीत म्हणुन तुला वाजतगाजत पोहचवु.शेवटी जायचं कधी हे नक्की करुनच बाप्पा तु आलायस,तेव्हा आम्ही कोण तुला थांबवणारे?कितीही आमचा लटका राग वा भाव असला तरी तु जाणारचं!कारण तुझ्या येण्या-जाण्यातुन तुला हेच सांगायचंय, अरे! इथे भुतलावर आलेल्या प्रत्येकजणालाच जावं लागणार आहे.
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही
(अध्याय-२.)
पण तरीही तुला एक सांगावेसे वाटते,आमचे काही चुकले असेल,राहुन गेले असेल तर त्याची क्षमा असावी”आम्हाला तुच सांगितलं
तुझ्याजवळ आर्तो,जिज्ञासु अर्थाथी,ज्ञानी असे चार भक्त येतात.
चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ।।
(अध्याय-७)
तुला हवी त्याच आर्ततेने आरती म्हटली की नाही बाप्पा,हे माहित नाही,पण हे गणाधिदेवा ! आम्ही तशी म्हणण्याचा प्रयत्न मात्र जरुर केला,यापुढेही करु.बाप्पा! आमच्यासाठी अथर्वशीर्ष/मंत्रपुष्पांजली समजुन पाठांतर व त्यानंतर ते म्हणणं,तर दुरचीच गोष्ट,पण ते कुणी म्हणत असताना त्याच्यामागे म्हणत पुढच्या गणेशोत्सवाच्या वेळी ‘मीही जरुर तशीच पाठांतर करेन’असा संकल्प मात्र जरुर केला.आम्ही ग्वाही देतो बाप्पा,’भले आमची बुद्धी कमी असु देत,पण श्रद्धा मात्र तुझ्या पुर्णदंता सारखीच असेल’.तु येतोसच मुळात सज्जनांना-भक्तांना भेटावया(परित्राणाय साधुनां).सज्जन जेव्हा एकटे पडतात,त्यांना खुप प्रयत्न केल्यावरही कुणी दाद देत नाही,दुर्लक्ष होते,सुरुवातीला कुठे विरोध होतो,नंतर कुठे स्तुतीही ऐकावयास मिळते,निराशाही डोकावते.पण अशा सर्वावस्थेत तु मात्र त्यांची साथ कधीही सोडत नाहीस.सज्जनांच्या संकल्पानां बळ मिळावं,म्हणुन सोबत आईला(शक्तीला) देखील आणतोस.सत् करता प्रयत्न करणा-यांत ओज,तेज,स्फुर्ती,उत्साह टिकावा म्हणुन नानायोजना तु आखतोस.पण जाता जाता हेही सांगतोस,
“बाळा!मी जरी कृपा करत असलो असे मानत असलात तरी मी प्रयत्नसाध्यही आहे,तेव्हा प्रयत्नविश्वास ठेवा.कारण केलेले कधीच वाया जात नाही,आणि केलेलं हे मिळतच मिळतं.मी जरी पार्थिव रुपाने आलो आणि जात असलो तरी कायम मी सर्वांच्याच सोबत ह्या देहरुपात(॥ त्वं देहत्रयातीतः ॥) अवस्थित आहेच.बरेच लोक म्हणतात,मोरया नावाच्या भक्तास मी सहजच भेटलो अस्सं नाही बाबानों.ज्याचे त्याचे प्रयत्न हे त्यालाच करावे लागतात.मोदक नावाचा प्रसाद मी सर्वांना देतोच.पण त्याचा गोडवा हा मोदक वरवर चाटणा-याला कदापि माहिती होणार नाही,त्याकरता त्याच्या आत सारणापर्यंत जावं लागेल.तसंच जो मनुष्य कुठल्याही गोष्टीचा जेव्हा स्वप्रयत्नांनी मुळारंभ शोधतो,तेव्हा त्याला आनंदप्रसादाची व अर्थाची प्राप्ती नक्कीच होते.ज्यानं आयुष्यात,समाजात आपले कर्म केवळ कीर्ती,स्वार्थ,संधीसाधु वृत्तीकरता न करता भगवंतासाठी प्रामाणिकपणे केलं,ती सगळी मेहनत माझे निरीक्षणात्मक सूक्ष्म डोळे अचुकपणे टिपतात.”
श्रद्धेपोटी प्रत्येकजण’माझा बाप्पा,माझा बाप्पा’बोलत असतो,त्यातलाच मीही एक,पण शेवटी बाप्पा तु कुणाचा?हा अंतिम निर्णय हा बाप्पाचाच!!!तुला जीवनात समजण्यासाठी त्यानंतर तुला
आणण्यासाठी,मस्तकात व ह्रदयात स्थिर होण्यासाठी प्रयत्न तर बाप्पा प्रत्येकालाच करावे लागतात.बाप्पाला सांगुयात त्यासाठी प्रयत्न तर आम्ही केवळ ह्या गणेशोत्सवादरम्यानच नाही तर जीवनातही करुच. गणप्रमुख,नेता तर तु आहेसच,समाजात वावरताना तुझ्याकडून आदर्शतत्व घेऊन निरीक्षण,तदरुप कार्य मान्यवरांकडून घडो.मुषकरुपी चंचल मनाच्यावरही अंकुश ठेवण्याचं दर्शन तुझ्या रुपातुन सगळ्यांना घडो.शेवटी,गणाधिदेवा,गणेशा! तुला एकच मागणं.
तु सगळ्यांचा लाडका तर आहेसच,पण तुला आम्ही लाडके वाटलो पाहिजे अश्या कार्यासाठी आम्ही निमित्त होवो,भगवदकार्य कार्य हातुन घडो,एवढाच आशिर्वाद आम्हास दे.
– संतोष राजदेव