1995 सालापासून दरवर्षी 16 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (UN) पर्यावरण कार्यक्रम विभागातर्फे “आंतरराष्ट्रीय ओझोन दिन” साजरा केला जातो.
जाणून घेऊया ओझोन विषयी काही खास गोष्टी
ओझोन थर म्हणजे काय?
पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात. वातावरणाचे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर, बाह्यांबर असे विविध थर असतात. यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारणतः तेरा किमी अंतरापर्यंतच्या थराला तपांबर म्हणतात.तपांबराच्या बाहेर सुमारे पन्नास किमी पर्यंतचा थर स्थितांबर असतो.या थराच्या खालच्या भागात ओझोनची घनता जास्त असते.हा थर ओझोनचा थर म्हणून ओळखला जातो.सजीवसृष्टीसाठी घातक अशी सुर्यापासून आलेली अतिनील किरणे शोषून घेवून सजीवांचे रक्षण करण्याचे महत्वपूर्ण काम ओझोनचा थर करत असतो.
ओझोनची आवश्यकता
सुर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांमुळे त्वचेचा कॅन्सर व त्वचेचे आजार,डोळ्यांचे विकार तसेच इतरही अनेक आजार जडण्याची शक्यता असते.याशिवाय अशी किरणे सजीवांची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कमी करु शकतात.मात्र वातावरणातील ओझोन वायूचा थर अतिनील किरणांना प्रतिबंध करतात.त्यामुळे सजीवसृष्टीला हानी पोहचत नाही.त्यामुळेच ओझोनचा थर सुरक्षित राहणे खूप गरजेचे आहे.कारण वातावारणातील ओझोनचा थर हा एकप्रकारे सुरक्षा कवच म्हणून काम करत आहे.
हानिकारक घटक
सुर्यापासून निघणारी घातक अतिनील किरणे थोपवून ठेवत इतर किरणे पृथ्वीकडे जावू देणारा वातावरणातील ओझोनचा थर एकप्रकारे चाळणीचे काम करतात.ओझोनच्या थराला हानी पोहचणे म्हणजे घातक अतिनील किरणांना पृथ्वीवर येण्यास परवानगी दिल्यासारखे आहे. त्यामुळेच ओझोन सुरक्षित राहण्यासाठी त्यास हानी न पोहचण्याबाबत जागरुक असले पाहिजे. क्लोरोफ्लुरोकार्बन (सीएफसी),हायड्रोफ्लुरोकार्बन (एचसीएफसी) आदि ओझोनसाठी हानिकारक घटक आहेत.सदर घटक हे विविध वातानुकूलित यंत्रे,रेफ्रिजेटर्स,स्प्रे,अग्निशमन यंत्रे तसेच विविध शीतगृहे आदिंमधून बाहेर पडतात.
वृक्षारोपण हाच उपाय
ओझोनचा थर सुरक्षित राखण्यासाठी अॉक्सिजनचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे.ओझोनच्या वाढीसाठी वृक्षारोपण हाच सर्वोत्तम उपाय असून वड,पिंपळ,आंबा,लिंब,चिंच यासारख्या वर्षानुवर्षे टिकणाऱ्या झाडांची लागवड करुन त्यांचे संवर्धन करण्यावर भर दिला पाहिजे