त्याने कधीच तिच्यापासून काही लपवून ठेवलं नव्हतं. जरा कुठे काही घडलं की तो पहिले तिला येऊन सांगायचा. छोट्या छोट्या प्रसंगाचं देखील सगळं डिटेल मध्ये वर्णन करायचा. तिच्याशी खोटं बोलणं त्याला जमायचं नाही. त्यादिवशी फेसबुक च्या सर्च हिस्ट्री मध्ये, तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडचं प्रोफाइल चेक केलं हे त्याला दिसलं. जुन्या मैत्रिणीकडे एक्स बॉयफ्रेंडबद्दल तिने केलेली विचारपूस त्याने चॅटिंगमध्ये वाचली. दोघेही एकमेकांचा मोबाईल बिंधास्त वापरायचे. दोन तीन दिवसानंतर फक्त तेवढेच मेसेज तिने चॅटिंग मधून डिलीट केल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याची चिडचिड होऊ लागली. तिने लपवाछपवी करायला नको होती म्हणून त्रास होऊ लागला. दोन दिवस त्याने तिच्याशी बोलणं टाळलं.
मित्रासोबत नाईटआउटला गेल्यानंतर त्याने मनातील खदखद शेअर केली. मित्र अशा अनुभवातून पूर्वी गेला असल्यामुळे, त्याने केलेल्या चुका मित्राने करू नयेत असं त्याला मनापासून वाटलं आणि तो म्हणाला,
” तिला भूतकाळात डोकावू वाटलं, जुन्या प्रियकराबद्दल विचारपूस करावी वाटली, ते तिने तुझ्याशी शेअर केलं नाही, लपवून ठेवलं याबद्दल तू तिला अजिबात काही बोलू नको. तिला हेच वाटणार की तुझा विश्वास नाही. उलट असं वाटेल की तू पजेसिव्ह होतोय आणि जाब विचारतोय. प्रत्येकाचे काही सिक्रेटस असतात. कोणी जोडीदारासमोर ते ओपन करतो तर कोणी करत नाही.
या परिस्थितीमध्ये तू चिडला, रागावला, तिच्याशी भांडण केलं, रागात काही तोंडून निघालं तर दोष हा तुला दिला जाणार. तुझं वागणं पजेसिव्ह ठरवलं जाणार. त्यामुळे शांत राह. कोणामध्येही सगळं काही विसरून गुंतू नये. त्यांच्यावर हक्क गाजवू नये. तिला वाटलं, तिने केलं, तिचं आयुष्य. तू यावर रिएक्ट होऊन वाईट ठरू नको. कदाचित वेळ जाईल तसं ती देखील हे सगळं विसरून जाईल. तू जसा तिच्यावर प्रेम करत आला तसंच इथून पुढेही करत राहा.
काही सिक्रेटस तिथेच पुरून टाकायची असतात, त्याचं गाठोडं उघडायला घेतलं तर सगळ्याचंच आयुष्य उध्वस्त होतं.” त्याला पटलं. त्याने दुसऱ्यादिवशीपासून पुन्हा तिच्याशी हसत खेळत, नॉर्मल वागायला सुरवात केली…
-अभिनव बसवर