कसे जंगल हिरवेगार,
मखमल हिरवी जणू छान.
शोभे कशी तिथे माझ्या शंकराची पिंडी,
नका बांधू रे तिथे या कॉंक्रिटच्या भिंती…….
कसा फुले हा झरा निसर्गाचा,
येणारा आवाज तिचा हृदयाचा.
मनसोक्त तिथे तिला मारू द्या उसंडी,
नका बांधू रे तिथे या कॉंक्रिटच्या भिंती.
उंच झाडे कसे रेषेत चाले,
दाटीवाटीने उभे ते आभाळाशी बोले.
चालली जणू माझ्या विठुरायाची दिंडी,
नका बांधू रे तिथे या काँक्रिटच्या भिंती.
थवा उडे नभी घेऊन संदेश धरणीचा,
नजर आभाळी हा वाहक देवाचा.
त्याच्या भरारीला का लावावी खिळ्यांची खुंटी,
नका बांधू रे तिथे या कॉंक्रिटच्या भिंती.
जनावरांचा आवाज जंगलाची शांतता भंग करे,
हृदयाची धडधड, पापणीही ना तिथे लवे.
वाटु द्या त्या अकल्पनीय वातावरणाची भीती,
नका बांधू रे तिथे या कॉंक्रिटच्या भिंती.
विकासाच्या नावाखाली कत्तल ही केवढी करावी,
वणवा हा स्वार्थाचा किती आगही पेटावी.
पाणी माणुसकीचे शिंपडा ना जंगलावरती,
नका……. नका बांधू तिथे या काँक्रिटच्या भिंती.
– नेहांकी अरविंद