16 वर्षीय ग्रेटा थनबर्ग हिला राजकीय स्तरावर हवामान बदलाविषयी तातडीने पावले उचलण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल ‘राईट लाईव्हलीहूड’ या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या पुरस्काराला ‘प्रतिनोबेल किंवा पर्यायी नोबेल’ म्हणून ओळखले जाते. नोबेल शांतता पुरस्कारासाठीही ग्रेटाला नामांकन देण्यात आले आहे.
4 डिसेंबरला म्हणजेच नोबेल पारितोषिक वितरणाच्या सहा दिवस आधी स्टॉकहोम येथे हा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. ग्रेटा थनबर्गने स्वतःची ओळख 16 वर्षांची पर्यावरणप्रेमी कार्यकर्ता असा करून दिला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी तिने गेल्या वर्षी म्हणजेच 2018 साली ऑगस्ट महिन्यात स्वीडनच्या संसदेसमोर आंदोलन सुरू केले होते.
त्यानंतर तिने शुक्रवारी सतत आंदोलने केली आहेत, त्यामुळे वर्षभरात कितीतरी शुक्रवार ती शाळेतही जाऊ शकलेली नाही. ग्रेटाच्या आंदोलनाला “फ्रायडेज फॉर द फ्युचर” असे नाव मिळाले असून हे आंदोलन विविध देशांमध्ये पोहोचले आहे.