अमुक एक मतदारसंघच मला हवाय?….
इतकी वर्षे झिजलो पण तरीही उमेदवारी नाही दिली?….हवा सध्या जिकडे जातेय,तिथे जाण्यातच खरा शहाणपणा आहे….सत्तेशिवाय आपण काहीच करु शकत नाही बुवा….आणखी किती दिवस फक्त कार्यकर्ता म्हणुन मिरवायचं?….
जिल्ह्याच्या विकासासाठी पक्षबदल केला बुवा?….. .
ह्या आणि अशा कैक गोष्टी ह्या निवडणुकांच्या निमित्ताने पुढे येऊ लागल्यात.मी ठेवलेल्या निष्ठेचा कुठेतरी दुरुपयोग होतोय का?हा विचारही कैकांच्या डोक्यात आला असेल.असे जर असेल तर मग माझी निष्ठा नेमकी कुठे ठेवायची?ह्यासाठी विकल्पही शोधणं चालु असेल.कैकांचे निष्ठा ठेवण्याचे विकल्पही संपले असतील?मग आत्ता काय करायचे?म्हणुन अळीमिळी गुपचिळीही घेतली असेल.निष्ठा म्हणजे सत्ताकारणाच्या दृष्टीने वाहत जाणारा एक प्रवाह,अशी कुणी व्याख्या केली तरी कैकांना ती खरीही वाटेल.
निष्ठा म्हणजे च्यामध्ये स्थित/असणे.निष्ठा ही नेहमी स्वतंत्र विश्वास प्रदान करणारी तसेच दगडातही प्राण फुंकणारी असते. ज्या व्यक्तीवर वा ज्या विचारांवर ठेवायची त्यावर १०१% विश्वास तर हवाच पण प्रसंगी त्याकरता प्राणही झोकुन देण्याची तयारी असावी.असे जर असेल तर ती ठेवताना सतरा वेळा नक्कीच विचार करायला हवा.हे समजुन घेण्यासाठी एक दृष्टांत पाहु समजा,समोरच्या एखाद्या व्यक्तीने खांबाला धरलय आणि जोरजोरात ओरडतोय,मला सोड!मला सोड!…आत्ता त्याला पाहिल्यावर त्याला पाहणारा दुसरा व्यक्ती म्हणतो,अरे वेड्या त्याने तुला नाही,तुच त्या खांबांला पकडलय.अगदी तसंच आपल्या कधीही पुर्ण न होणा-या गरजांनी,काही कारणाने आपण एखाद्या व्यक्तीवर निष्ठा ठेवतो.नंतर तो खांबासारखा निघाल्यावर त्याच्या नावाने खडे फोडत बसतो.पण जर माझीच निष्ठा विवेकपुर्ण नसेल तर दोष तरी कुणाला द्यायचा?निष्ठा ज्यांच्यावर ठेवावी तो व्यक्ती स्वतःचे नाव मोठे करुन घेतो.तद्नंतर ज्याने मोठे केले त्यांचे आभार तर दुरच पण साधं नावही घेत नाही.
खरं तर निष्ठासत्व अस्सं रसायन आहे,ती पुर्ण व योग्य ठिकाणी असली तर काहीही चमत्कार घडु शकतो.काहीही उपकरणे वा साधने नसतानाही खर्या निष्ठेला कुणीही डावलु शकत नाही.मग भले सत्ता नसली तरी चालेल,पण प्रयत्न मात्र आहे त्या परिस्थितीत यथाशक्ती हवा. “क्रियासिद्धी सत्वे भवती महता नोपकरणे”(महापुरुषांची क्रियासिद्धी ही उपकरणात कधीच नसते तर सत्वात असते)
चार तट्टु आणि चार मुठभर मावळ्यातही साम्राज्य उभं राहतं.यशाची धुंदीतही मावळ्यांना न विसरणाराच खरा राजा असतो.
निष्ठेचा रस्ता हा नेहमीच अग्निपरीक्षेतुन जातो.मग भले तो जन्मतःच सोन्याचा चमचा तोडांत घेऊन जन्मलेला का असेना.सदविचार व निष्ठेसोबत तितिक्षा(संयम),विश्वास व अविरत प्रयत्न व आशा यांची सांगड असली तरच(इस्त्रायल) वाळवंटातुनही गुलाब,सफरचंदे उगवले जाऊ शकतात,त्याला सुपीक जमीन हवी असे काही नसते.कैकदा सुपीक जमीनीत गुलाब येतीलच ह्या विश्वासावर आपण नको तितके सश्यातल्या गोष्टीसारखे निश्चिंत राहतो.आणि मागुन येऊन कासव कधी शर्यत जिंकतो,हे कळतही नाही.हे ही तितकंच खरं ख-या निष्ठेला डावललं तर मिळालेलं यशही धुसर राहते.
– संतोष राजदेव