एकमेकांशी रक्ताच्या नात्याने जोडल्या गेलेल्या सदस्यांना मिळून जे तयार होतं ते ‘कुटुंब’.त्यात साधारणतः तीन पिढ्यांचं एकत्रीकरण बघायला मिळतं.”आईवडिलांना सगळी मुलं सारखीच असतात.”,असं म्हटलं जातं.पण, कधीकधी आईवडील स्वतःच्या एका विशिष्ट मुलाशी किंवा मुलीशी भावनिकद्रृष्ट्या जास्त जोडले जातात.परिणामी प्रत्येक मुलाच्या संगोपणात थोड्या प्रमाणात वेगळेपणा येतो. मोठं झाल्यावर कुणाला मनासारखं आयुष्य जगायला मिळतं, कुणाला कुटुंबाचं हित बघता स्वतःच्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करावं लागतं, एखाद्याला तर फार कमी वयातच कुटुंबाचा पोशिंदा व्हावं लागतं.
दोन पिढ्यांमधील व्यक्तींमध्ये वाद सुरु झाला की बहुधा मतांमधील या अंतराला ‘जनरेशन गॕप’ असं नाव देऊन त्यातून पळ काढण्याचा प्रयत्न केला जातो. पिढ्यांमध्ये असलेल्या अंतरामुळे खूप काही बदललेलं असतं. त्या त्या फेज मधून जाताना बदललेली परिस्थिती, संवादाची बदललेली माध्यमं असल्या अनेक गोष्टींमध्ये फरक जाणवतो. अर्थातच त्याचा विचारांवरही परिणाम होतो. त्यामुळे दोघांचा दृष्टिकोन एकमेकांनी लक्षात घेऊन दोघांनाही पटेल असा योग्य निष्कर्ष काढणं ही परिस्थितीची गरज असते.
एक माणूस म्हणून आपल्या त्रासाची, कष्टाची किंवा त्यागाची जाणीव इतरांना होऊन त्याची दखल घेतली जावी असं वाटणं स्वाभाविक आहे. पण, ज्यावेळी आपणच सर्वस्वी आहोत असं वाटायला लागतं तेव्हा त्याचा अहंकार येत जातो व क्षणाक्षणाला त्यात भर पडत जाते.लहान लहान इगो एकत्र येता येता दोन माणसं एकमेकांपासून वेगळी कधी होतात कळतही नाही.नात्यातील ओलावा कमी होत जातो व जगासमोर खोटं हसू दाखवण्याशिवाय पर्याय उरत नाही.
यापेक्षा लहान मुलाच्या आयुष्याकडे लक्ष वेधावसं वाटतं. ते मूल आनंदात हसतं, त्रास झाला की रडतं. पण, कधीही जजमेंटल होत नाही, खोट्या व टाकाऊ अपेक्षांचं ओझं घेऊन ते वावरत नाही, जपून वागणं काय असतं हेही त्याला ठाऊक नसतं. त्याचं वागणं म्हणजे एखाद्या उतारावर वाहणाऱ्या पाण्यासारखं ‘एकाच दिशेने व प्रवाही’ असतं. त्यामुळे शारीरिक वजनाप्रमाणे मनानेही ते तितकंच हलकं असतं.
आपल्या आयुष्यात अजून एक फेज येतो जिथे आयुष्य आपलं खरं मूल्यमापन करतं तो म्हणजे “आईवडिलांचं म्हातारपण”.म्हातारपण म्हणजे त्यांच्या बालपणीच्या सिक्वेलची सुरुवातच असते. मुलाबद्दलचा पसेसिव्हनेस अर्थात तो दूर जाणार नाही याची काळजी, तब्येतीमुळे होणारा शारीरिक त्रास, त्यामुळे होणारं मानसिक खच्चीकरण यामुळे त्यांच्या आयुष्यात पुन्हा बाल्यावस्था ओढावली जाते.त्यावेळी आपल्यालाच मायबापाची भूमिका बजावावी लागते. स्वतःच्या स्वप्नांशी, गरजांशी त्यांनी केलेली तडजोड, आपला बाळाचा माणूस होईपर्यंतच्या प्रवासातील त्यांचा ‘रोल’ लक्षात घ्यावा लागतो. स्वतःचा संसार थाटताना आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा बुरूज ढासळू न देता त्याला सतत सुशोभित ठेवून त्याचा सांभाळ करणं ही जबाबदारी न वाटता मनापासून एक कर्तव्य वाटेल तेव्हा आपण माणूस म्हणून स्वतःच्याच नजरेत ग्रेट झालेलो असू.
आज इंटरनेटने दूरच्या लोकांना जवळ आणलंय. पण, जवळ असलेली माणसं दूर गेलीत त्याचं काय? त्यांना जवळ आणण्यासाठी कुठली टेक्नॉलॉजी वापरणार आहोत आपण? त्यावर फुंकर म्हणून आनंदाचा एक सेंटर पॉईंट शोधून त्याभोवतीच परिक्रमा घालुयात का? गरज असली तेव्हा आपणच एकमेकांचे सूर्य, चंद्र किंवा तारे होऊयात का?असं करताना त्यावेळी कदाचित आपला प्रकाश कमी होईलही. पण, त्यामुळे इतरांच्या सुखावस्थेने आपण उजळून मात्र नक्की निघू. त्याची संकल्पना खरोखरच या ब्रम्हांडाएवढीच अखंड व असीमित राहील ही खात्री आहे.
– सुबोध राऊत