हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष हॉकी संघाने अखेरीस आपलं ऑलिम्पिकमधलं स्थान निश्चीत केलं आहे. भुवनेश्वर शहरात पार पडलेल्या सामन्यात भारताने रशियाचा ७-१ ने धुव्वा उडवला.
शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताने रशियाची झुंज ४-२ अशी मोडून काढली होती. या तुलनेत शनिवारचा सामना एकतर्फी झाला. एकूण गोल फरकांमध्ये ११-३ च्या फरकाने भारतीय संघाने बाजी मारत टोकियोचं तिकीट पक्क केलं आहे.
भारताकडून आकाशदीप सिंह, निलकांत शर्मा, रुपिंदर सिंह आणि अमित रोहिदास यांनी गोल झळकावत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र होण्याची भारतीय हॉकी संघाची ही २० वी वेळ ठरली आहे.
आतापर्यंत भारतीय संघाच्या खात्यात ८ सुवर्णपदकं जमा आहेत. त्यामुळे आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत ग्रॅहम रिड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.