राज्यात सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज सकाळी राज्याच्या राज्यपालांकडे मुदत वाढवण्याच्या मागणीचे पत्र दिले होते. मात्र राज्यपालांनी मुदत वाढवून दिली नाही आणि केंद्राकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला यासंबंधीचं पत्र पाठवले होते. त्यानंतर राष्ट्रपतींनी राज्यपालांच्या शिफारसीनुसार निर्णय घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रपती राजवट लागू असली तरी एखाद्या पक्षाने पुरेसे संख्याबळ दाखवल्यास त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिली जाऊ शकते. त्यानंतर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवली जाऊ शकते.
भाजपनंतर शिवसेनाही राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करू शकली नव्हती. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेस पाचारण केलं होतं. परंतु राष्ट्रवादी पक्षानेही सत्ता स्थापन करण्यासाठी सकारात्मक भूमिका न दाखवल्याने राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती.