मुंबई – महाराष्ट्रात यावर्षी अतिवृष्टी व लांबलेल्या पावसामुळे शेती व त्यापुरक व्यवसायांवर परिणाम झाले आहेत. त्यातच अवेळी आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या तर हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. ओला दुष्काळाचा सर्वात जास्त फटका बसलेल्याने शेतकरी कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर काल उशिरा अभाविप शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांची त्यासंदर्भात भेट घेतली.
महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच विद्यापीठात ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे आर्थिक संकटाचा साहजिक परिणाम शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यावरही झाला आहे. यातच विद्यापीठे व त्यासंलग्नित शैक्षणिक संस्था मध्ये विविध पारंपारिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसमोर शैक्षणिक शुल्क भरण्याचे मोठे आवाहन उभे राहिले आहे. ओला दुष्काळ व त्यामुळे उद्भवलेली परस्थिती लक्षात घेता शेतकरी वर्गातील विद्यार्थी शैक्षिणिक शुल्क भरणार कसे हा प्रश्न अभाविपने मा राज्यपालांना समोर उभा केला. तसेच अनेक ठिकाणी महाविद्यालये व संस्थांच्या रेट्यामुळे नाईलाजास्तव पालकांनी कर्ज काढत शुल्क भरत असल्याचे अभाविपने राज्पालांच्या निदर्शनास आणून दिले.
ओला दुष्काळाच्या स्थितीतून मार्ग काढीत शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी महारष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी अभाविप शिष्टमंडळाने मा राज्यपालांना सांगितले. अभाविपने राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांनाही विद्यार्थ्यांचे शुल्क माफ होण्याची निवेदने दिली असून त्यातील काही विद्यापीठांनी पुढाकार घेतला असला तरी त्याबाबतीत राज्यपालांनी सर्व विद्यापीठे व जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबतीत स्पष्ट निर्देश द्यावेत अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने मा राज्यपालांकडे केली. आसमानी संकटातून मार्ग काढण्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शुल्क माफ करण्याची आग्रही मागणी मा राज्यपालांकडे यावेळी केली असल्याचे कोंकण प्रदेशमंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी सांगितले. तसेच अभाविपच्या अन्य मागण्यावर मा राज्यपालानी सकारात्मक प्रतिसाद देत, महाराष्ट्रातील कुलगुरू अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून शैक्षणिक व वसतिगृह शुल्क माफ करण्यावर तत्काळ तोडगा काढण्याचे निर्देश देणार असल्याचे मा राज्यपालांनी शिष्टमंडळाला सांगितले असल्याची माहिती ओव्हाळ यांनी दिली व यातून लवकरच विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.