मुंबई | विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात बीएमएम (बॅचलर ऑफ मास मीडिया) विभागातर्फे कायम नवनवीन संकल्पना घेऊन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गेली 7 वर्षे आयोजित केला जाणारा माध्यम महोत्सव हा त्याचाच एक भाग आहे. साठ्ये महाविद्यालयातून पत्रकारिता विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पत्रकार परिषद कशी आयोजित केली जाते आणि ती कशी असते याचा अनुभव मिळावा आणि माध्यम महोत्सवाची सर्वदूर पोहचावी यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. साठ्ये महाविद्यालयातील चौथ्या मजल्यावर शनिवारी सकाळी 11:30 वाजता ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेद्वारे अंकिता मांजरेकर, स्वप्नील गावडे, भगवान बोयाळ हे तीन प्रवक्त्यांनी यंदाच्या माध्यम महोत्सवाची माहिती दिली.
या पत्रकार परिषदेत माध्यम महोत्सवाची गेल्या सात वर्षातील पार्श्वभूमी सांगण्यात आली. तसेच यंदाचा माध्यम महोत्सव हा ‘संगीत’ या थीमवर आधारीत असेल असे घोषित करण्यात आले. हा माध्यम महोत्सव तीन दिवसांचा असून डिसेंबर महिन्यातील 18, 19, 20 या दिवशी असेल. या महोत्सवात 16 वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहेत. ‘जिम साँग’ आणि ‘TikTok’ च्या धर्तीवर आधारीत सादरीकरण अशा अनोख्या स्पर्धांचा समावेश आहे. या महोत्सवात मुंबईतील 60 महाविद्यालयांना सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले जाणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली. महाविद्यालयांप्रमाणेच सर्वसामान्य संगीतप्रेमींनाही महोत्सवात सहभागी करून घेता यावे यासाठी काही स्पर्धा या सगळ्यांसाठी खुल्या अशा पद्धतीने ठेवण्याचा मानस असल्याचं प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बीएमएम विभाग आमचं एक कुटुंब आहे अशी प्रतिक्रिया बीएमएम विभागप्रमुख गजेंद्र देवडा यांनी व्यक्त केली. तसेच हे कुटुंब असेच विस्तारत जाऊ देत आणि यंदाच्या माध्यम महोत्सवालाही खूप सारे प्रेम आणि सर्वांच्या भरभरून प्रतिसाद मिळू दे असे मनोगत त्यांनी पत्रकार परिषदेनंतर व्यक्त केले. ही पत्रकार परिषद पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी तुडुंब गर्दी केली होती.