नवी दिल्ली | गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील भाजपचे खासदार अशोक नेते यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करणारे खासगी विधेयक लोकसभेला सादर केले. लोकसभेतील खासगी विधेयकांच्या यादीत खासदार अशोक नेते यांचे स्वतंत्र विदर्भाचे विधेयकही होते. मात्र, ते सभागृहात उपस्थित नसल्याने हे विधेयक लोकसभेत मांडले गेले नाही. स्वतंत्र विदर्भाला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. भाजपशी मैत्री तोडून शिवसेना दोन काँग्रेससह राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असतानाच हे विधेयक सादर केले गेल्याने राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत. लोकसभेचे पीठासीन अधिकारी प्रेमचंद्रन यांनी नेते यांचे नाव पुकारले होते. मात्र, नेते सभागृहात गैरहजर होते.
दरम्यान, डिसेंबर २०१४ मध्ये हिवाळी अधिवेशनातही नेते यांनी स्वतंत्र विदर्भाबाबत खासगी विधेयक मांडले होते. त्यानंतर २०१६मध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये भाजपचे तत्कालीन खासदार नाना पटोले यांनीही स्वतंत्र विदर्भाचे खासगी विधेयक लोकसभेत मांडले होते. त्याचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटले होते. विधानसभेत शिवसेनेच्या आमदारांनी स्वतंत्र विदर्भाच्या विधेयकाबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहात गदारोळ झाला होता.