किनाऱ्यापासून थोडे दूरच
लाट येते, उसळते, माघार घेते
क्षणात फेसाळते, किती पटकन शांत होते
तू हसतोस, दूर होतोस
मी अधीर, मन बधिर, चरफडते
समुद्र उधाणला असतो माझ्या मनात
हिरमुसते, लटकंच रुसते
तू जाणवतोस मग हातात, शांत होते, क्षणात
तुझे इरादे मग मनगटावर उमटलेली बोटंच स्पष्ट करतात
तुला नजर द्यायची काय बिशाद? माझे डोळे इथे हरतात
काय तडफ असते ती! मी अधीन व्हायलाच हवं!
मोहरते.. अगदी चूरर होते
तू निर्लज्ज, रंगत राहतोस
दात रुतवून हसत पाहतोस
का दूर केलं मी तुला? अचानक?
एक अर्धासा श्वास, आणि पूर्ण निःश्वास
आता प्रश्न दिसतो तुझ्या डोळ्यात
आणि उत्तर खाली पडलेल्या माझ्या नजरेत
तुझं तू शोधायचं, एकट्याने मिळवायचं
बाजूच्या स्मशानात विझू घातलेली बेवारस चिता
दुराव्याच्याच आधाराला बांधून ठेवलेली एकटीच आशा
नक्की काय विझणार आहे? एवढ्यात?
संपूर्ण उध्वस्त होऊन तुझ्या छातीवर रडत राहायचंय..
हे असंच.. कायम
आता का तुझे हात मिठीत घेत नाहीत?
पाठीवरून सुद्धा फिरत नाहीत
आणि तेवढ्यात ती येते, न बोलावता, लाट
तीच विलग करते.. तीच उत्तर देते.. संपवते.
चिता विझत नाही.. विझवली जाते!
ओहोटी च्या वेळी त्या एकट्या उर्मिने इतकं दूर का यावं?
कशासाठी?
– मृगा वर्तक