१३ आणि १४ फेब्रुवारी २०२० सह्याद्री देवराई, पालवण, बीड येथे जगातील पहिले वृक्षसंमेलन आयोजित करण्यात आले होते. सिनेअभिनेते सयाजी शिंदे, लेखक अरविंद जगताप यांची संकल्पना आणि वन विभाग बीड व कृषीभूषण शिवराम घोडके यांच्या परिक्षमातून हे वृक्ष संमेलन पार पडले. याच संमेलनाचा एक भाग म्हणून सह्याद्री देवराई आयोजित इंडियन भारत लेखन स्पर्धा घेण्यात आली होती. राज्यभरातून अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. कल्याण येथील अविनाश पाटील या युवकाला माझं आवडतं झाड या विषयांवर केलेल्या लेखनासाठी विजेता घोषित करण्यात आले. विविध विषयांत सहभागी एकुण २५ विजेत्यांची नावे यावेळीं घोषित करण्यात आली आणि त्यांना सिनेअभिनेते सयाजी शिंदे, लेखक अरविंद जगताप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
विशेष म्हणजे सध्या पालघर जिल्ह्यातील जलसमस्या या विषयांत पीएचडी करत असलेल्या अविनाशच्या कामांची ओळखा स्वतः लेखक अरविंद जगताप यांनी उपस्थितांना करून दिली. अंघोळीची गोळी संस्थेच्या माध्यमाने खिळेमुक्त झाडं हा उपक्रम अविनाश आणि त्यांची टीम महाराष्ट्रात विविध ठिकाणी करत आहे आणि झाडांसाठी असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी ही तरुण मंडळी काम करत आहे असेही ते यावेळीं म्हणाले. पाणी बचत आणि वृक्ष संवर्धनासाठी प्रत्येकाने शक्य ते योगदान द्यावे असे स्पर्धा विजेत्या अविनाश पाटीलने यावेळीं सांगितले.