‘डी-मार्ट’ या भारतातील सर्वात मोठ्या रिटेल चेनचे संस्थापक राधाकृष्णन दमानी हे देशातील सर्वांधिक श्रीमतांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे व्यक्ती ठरले आहेत. मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत (५७.४० अब्ज डॉलर्स). त्यांच्यानंतर आता दमानी हे सर्वांधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. दमानींची संपत्ती १३.३० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्यांची ही संपत्ती लक्ष्मी मित्तल (१३.१०अब्ज डॉलर), गौतम अदानी (१०.९ अब्ज डॉलर) आणि सुनील मित्तल (९.६२ अब्ज डॉलर) यांच्यापेक्षा अधिक आहे.
‘डी-मार्ट’च्या शेअर्समध्ये २०१७ पासून ७०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर १.६० लाख कोटी रुपयांचे भांडवल आहे. ‘डी-मार्ट’चे देशातील ७२ शहरांत १९६ स्टोअर्स आहेत.
राधाकृष्ण दमानी यांनी शेअर दलाल म्हणून करिअर सुरु केले होते. त्यानंतर त्यांनी यशस्वी उद्योगपतीपर्यंत झेप घेतली. डी-मार्ट या सुपर मार्केट्सची मालकी असलेला ‘अव्हेन्यू सुपरमार्टस्’चा शेअर सध्या शेअर बाजारातील सर्वाधिक चर्चेतला शेअर आहे. ‘अव्हेन्यू सुपरमार्टस्’च्या शेअरने गेल्या काही दिवसांत मोठी उसळी घेतली आहे.
‘अव्हेन्यू सुपरमार्टस्’ २१ मार्च २०१७ मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाली होती. त्यावेळी कंपनीचे बाजार भांडवल ३९,९८८ कोटी होते. आता ते १.६० लाख कोटींवर पोहोचले आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून ‘अव्हेन्यू सुपरमार्टस्’चा शेअर वधारतच आहे. यामुळे गुंतवणूकदारांबरोबरच कंपनीचे मालक राधाकृष्ण दमानी मालामाल बनले आहेत.