नोबेल पुरस्कार विजेते थोर भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रमन यांनी लावलेल्या रमन इफेक्ट या शोधाचे स्मरण म्हणून देशभर २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (मअंनिस) वतीने सुद्धा हा दिवस महाराष्ट्रभर साजरा केला जातो. मअंनिस कल्याण शाखेतर्फे २९ फेब्रुवारी रोजी पु. ल. कट्टा सुभाष मैदान कल्याण येथे सायंकाळी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला गेला. त्या निमित्त वैज्ञानिक दृष्टिकोन आणि घटनेतील मूल्ये या विषयावर मा. गीता महाशब्दे, संचालक नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशन पुणे व गणित शिक्षण तज्ज्ञ यांनी व्याख्यान दिले. व्याख्यान देतांना त्यांनी दृष्टीभ्रमाचा एक प्रयोग करून सुरुवात केली व नंतर काही वैज्ञानिक प्रयोग सादर करून पीपीटी च्या माध्यमातून अत्यंत रंजक पद्धतीने विषयाची मांडणी केली व उपस्थितांना विषय समजावून सांगितला.
व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी उपस्थितांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. सुषमा बसवंत अध्यक्ष मअंनिस कल्याण शाखा यांनी भूषविले. कल्पना बोंबे महिला सहभाग कार्यवाह मअंनिस ठाणे जिल्हा यांनी प्रास्ताविक करतांना अंनिसची पंचसूत्री व विविध उपक्रम यावर माहिती दिली. आभार प्रदर्शन शरद लोखंडे यांनी केले. या कार्यक्रमास कल्याण परिसरातील अनेक नागरिक पु. ल. कट्टाचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मअंनिस कल्याण शाखेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भरपूर श्रम घेतले. अशा प्रकारचे बौद्धिक, वैचारिक विषयांवरील कार्यक्रम वेळोवेळी सादर केले जावेत अशी अपेक्षा उपस्थितांनी कार्यक्रमानंतर व्यक्त केली.