वायसीएम हॉस्पिटल, पिंपरी, रविवार, ८ मार्च २०२०.
युथ ग्रुप पिंपरी चिंचवड आणि एनएमपी प्लस विहान यांच्या संयुक्त विद्यमाने वायसीएम हॉस्पिटल पिंपरी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. 'महिलांचा सन्मान एका दिवसापुरता नसावा, तो रोजच आपल्या वागण्यातून होत राहावा. युथ ग्रुप समाजोपयोगी कार्यक्रमात अग्रेसर असल्याचा सार्थ अभिमान आहे', असे विचार प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे मा. विजय भेंडे सरांनी मांडले. पहिल्या सत्रात स्त्रीसन्मान, गीतगायन, डान्स, वक्तृत्व अशा विविध माध्यमांचा आधार घेत महिला दिन मोठ्या उत्साहात पार पडला.
तसेच देशात वाढत्या बलात्काराच्या घटना अभ्यासता, 'दोष स्त्रीच्या कपड्यात नसून, पुरुषी वासनांध नजरेत असतो' म्हणून युथ ग्रुपने दुसऱ्या सत्रात 'अविचारांची होळी' केली. ज्यामध्ये विविध प्रश्नांना हात घालून त्यावर चर्चा, गप्पा, गुजगोष्टी, वैचारिक गाणी तसेच विचारविनिमय करण्यात आले . विहान पुणे १ चे प्रोजेक्ट कोऑरडीनेटर मा. संदीप एडकेवर यांनी आपले विचार सर्वांसमोर मांडले. मा. आशा घोडके यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले तर युथ ग्रुप लीडर अश्विनी हिने सूत्र सांभाळत प्रीतम याने आभारप्रदर्शन केले. सोबतच पुढील युथ ग्रुप मीटिंग दि. ५ एप्रिल रोजी वायसीएम विहान ऑफिसमध्ये होईल अशी घोषणाही करण्यात आली. महाराष्ट्र युथ ग्रुप सातत्याने एचआयव्ही/एड्स, टीबी, महिला दिन, संविधान जागर अशा विविध सामाजिक विषयांवर जनजागृती कार्यक्रम घेऊन समाजामध्ये बदल घडवण्यासाठी काम करत आहे.