सद्य परिस्थितीत कोरोना विषाणू रूपी महामारी आपला पंजा भारतभरात घट्ट आवळत आहे आणि संपूर्ण भारत सर्वशक्तीनिशी एकजुटीने त्याचा प्रतिकार करत आहे. जेव्हा जेव्हा अशी कुठली आपत्ती समाजावर आली आहे तेव्हा तेव्हा स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) आणि त्यांची सुपुत्री पूजनीय सौ. धनश्री तळवलकर (दीदी) यांनी नेहमीच सर्वांचीच चिंता केली आहे, काळजी केली आहे. काही दिवसांपूर्वी स्वाध्याय परिवारातर्फे हमरस्ते, मार्केट्स, अनेक वस्त्या यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी दूरवर व जास्त क्षेत्रात फवारणी करू शकणारी विशेष शक्तिशाली फॉगिंग मशिन्स मुंबई येथे राज्याच्या आरोग्य विभागाला तसेच मुंबई, नवी मुंबई, नाशिक, अहमदनगर, नांदेड येथील पालिकांना प्रदान करण्यात आली होती. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री माननीय श्री. राजेश टोपे यांनी त्याकरिता स्वाध्याय परिवाराचे कौतुक केले व धन्यवाद दिले. स्वाध्याय परिवाराने आरोग्य विभागाला व विविध पालिकांना दिलेली ही विशेष फॉगिंग मशिन्स जाहीर निर्जंतुकीकरणासाठी वरदानरूप ठरतील यात शंका नाही. आतापर्यंत अशी एकूण ८ मशिन्स प्रदान करण्यात आली आहेत.
इतकेच नाही तर स्वाध्याय परिवाराने वैद्यकीय क्षेत्रात जिवावर उदार होऊन सेवा बजावणाऱ्या अनेकांसाठी २,५०० मास्क्स (masks) याआधीच आरोग्य विभागाला प्रदान केले होते. पोलीस, सुरक्षा व इतर वैद्यकीय क्षेत्रात कोरोनाच्या या गंभीर प्रसंगातही सतत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी करत नुकतेच स्वाध्याय परिवाराने ग्लोव्ह्स, मास्कस व सॅनिटायझर एकत्र असणारे तब्बल ५,००० किट्स नवी मुंबई महानगरपालिकेला तर १,२०० किट्स कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला प्रदान केले आहेत. तसेच महाराष्ट्रात नाशिक व औरंगाबाद येथे प्रत्येकी ७,००० म्हणजे असे १४,००० किट्स यापूर्वीच प्रदान करण्यात आले आहेत. आपल्या जीवावर उदार होऊन आपल्या सर्वांची काळजी करणाऱ्या या एक प्रकारच्या सैनिकांप्रती आपली कृतज्ञता म्हणून स्वाध्याय परिवार हे करत आहे.
दरम्यान, आजवर देशात एकूण ५०,००० ते ५५,००० पेक्षा जास्त असे किट्स स्वाध्याय परिवाराने दिले आहेत, तर गुजरात राज्यात २६,००० विविध धान्यांची मोठी पॅकेट्स ‘लोकरक्षक दल’ या पोलीस विभागाशी संबंधित एका संघटनेला देण्यात आली आहेत. स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्रीदीदी तळवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम स्वाध्याय परिवारातर्फे होत आहे व दीदींनी अत्यावश्यक सेवेत अशा कठीण प्रसंगी पण कार्यरत असणाऱ्या बंधू-भगिनींचे स्वास्थ्य चांगले राहावे, त्यांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने हे किट्स प्रदान केले आहेत. अर्थात स्वाध्याय परिवारातर्फे दिली जाणारी कुठलीही वस्तू, हे किट्स किंवा फॉगिंग संयंत्र कोरोना संक्रमणासारख्या या विपरीत काळात केवळ आपली कृतज्ञता, सामाजिक भान व नैतिक कर्तव्य म्हणून समाजाला दिलेले एक छोटेसे योगदान आहे.