मी मुंबईला २०१० साली गेलो होतो… वसतिगृह कर्मचारी मानधन वाढीसाठी आझाद मैदानावर उपोषण होतं.. उस्मानाबादहुन रात्री रेल्वेने बसलो सकाळी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर उतरलो आणि भुयारी मार्गाने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला निघालो.. विविध प्रकारच्या दुकानांची गर्दी दिसत होती… रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसत होती…जवळच एका ठिकाणी नाष्टा केला… पंधरा रूपयात.. बटाटा भाजी आणि सात पुरी अशी प्लेट तिथे मिळाली.. तिथं एका पेपर दुकानातून उध्दव ठाकरे यांनी फोटो काढलेलं महाराष्ट्र देशा हे पुस्तक शंभर रूपयाला विकत घेतलं… रात्री गेटवे ऑफ इंडिया बघितला तिथून समुद्र खूप देखणा दिसत होता.तिथं किनाऱ्यावर अनेक जहाज लोकांना समुद्र सफर घडवून आणत होती.
मी एका जहाजात बसलो… बसताना नको वाटतं होतं साठ रुपये द्यावे लागणार होते. मी जहाजात बसून मुंबई बघू लागलो.. रात्रीत भिजणारी मुंबई एका वेगळ्याच रूपात दिसत होती. बघत बघत विचार करू लागलो… इथं अन्न वस्त्र स्वस्त आहेत पण निवारा स्वस्त नाही….मुंबई एक स्वप्न नगरी आहे इथं प्रत्येक माणूस स्वप्न घेऊन येतो त्याला एक विश्वास वाटतो की.. हि नगरी त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करेल… आपल्याकडं इतिहासात कल्पवृक्ष संकल्पना आहे. कल्पवृक्षाजवळ जाऊन त्याला काही मागितलं की हवं ते मिळतं.. अशीच हि मुंबई ची कथा आहे आणि हि दंतकथा भारतभर पसरली आहे.
मुंबईला नदी म्हणावं वाटतं.. कारण ती थांबत नाही नदी सारखी प्रवाही आहे… तिचं वाहण हे जीवन आहे… तिचं वाहतेपण म्हणजे जिवंतपण आहे.. समुद्रकिनारी वाहणारी नदी म्हणजे मुंबई असं काहीसं आपण म्हणू शकतो… नदी जर माणसाच्या रूपात वाहिली असती तर कशी दिसली असती तर त्याचं स्पष्ट उत्तर मुंबई आहे…. असं मला वाटतं.
मुंबई खूप बघायची होती पण खिश्याने नकार दिला मग नाईलाजाने माघारी फिरलो पण आजही मुंबई ची आठवण आली की, तिच्या वाहतेपणाचा आवाज येतो… कृपया यात्रीगण ध्यान दे… छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस से…. आणि मग मी त्या नदीत वाहत जातो…!! कोरोनामुळे….आज अशी वाहती नदी गोठली आहे… पण आज ना उद्या ती नक्की वाहिलं..कारण तिचा एकच धर्म आहे…वाहणे…!!
– देविदास सौदागर