आज यष्टी ला बाहत्तर वर्श झालेत मनुन कळालं… लय मजा असत्याय यष्टीत जागा धराची.तीची वाट बगावं लागतयं मग पावणी आल्यावनी ती यित्याय.यष्टीत चढताना फुकट खीर खायाला जायल्यावानी जोश असतयं.कवा कवा तर आपुन आद्दर होताव यवढी गरदी असत्याय. रुमाल टाकलं की शिट आपलं असतय मग.पण कलगा झाला तर दोन हात करावं लागतंय अन् त्यै काम कराच मनल की धिहयष्टी दणका असावं लागत्याय नायतर तांदळातनं खडा बाजूला काडल्यावानी बाजूला काडतेत.बरं डायवर बिरेक मारलं की, डोळा लागल्याला असलं तर उगडतय अन् हाताला व्हट मनून खिडकी नायतर लोकंडी हंडेल लागतंय.
झोपल्यावर कंडाक्टर आलं तर झोपीतून उटल्यावर कुट जायचं हि सांगाला येळ जातंय.मग गुर्जी वरडल्यावानी कंडाक्टर वरडतय तवा यष्टी एक वर्ग वाटत्याय अन् आपुण बाकड्यावर बसलावं वाटतंय.यष्टीत शेजारी कसला मिळलं सागता येत नाय.कोण घुरतय तर कोण खांद्यावर मान टाकतं तर कोण पचमन् थुकतय तर कोण वळखं काडून बोलत बसतय. कवा कवा चिल्लर नसल्यावर तंटा व्हतय.तवा लोकं मनतेत चिल्लर गुष्टीसाटी तंटा झालं बगा. यष्टीत बसल्यावर यष्टीची पाटी उलटी दिसत्याय ती यक लय भारी गोष्ट हाय..जागा मिळना झालं तर इंजिनावर बसावं लागतंय मग खरं शिट भाजून निगतय.घंटी वाजली की शाळा सुटावं तसं लोक बाहिर पडतेतं अन् मदीबी घुसतेत..त्येंना घुसखुर मनावं का काय वाटतंय.यष्टी शीर हाय आपली ती हाय मनुन तर सगळं जित्तं हाय असं वाटतंय…!– देविदास सौदागर