तिचं नुकतंच ब्रेकअप झालेलं. त्यातून ती सावरत होती. आई वडील अमेरिकेला गेले आणि तिथेच सेटल झाले त्यामुळे ति जास्त कधी महाराष्ट्र्रात आली नव्हती. यावेळी तशी ती कळती झाल्यानंतर पहिल्यांदाच तिच्या आजोबांच्या घरी आलेली. हॉलमध्ये प्रवेश करताच समोर भिंतीवर महाराजांची फ्रेम होती. आजोबांनी तिचं स्वागत केलं. तिने बेडरूम मध्ये पाहिलं तर तिथेही कंप्युटर स्क्रीनच्या मागे छत्रपती संभाजी महाराजांची फ्रेम होती.आजोबांच्या बुकशेल्फमध्ये शिवचरित्र ते शंभू चरित्र अशी अनेक पुस्तके होती.
संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आजोबा आणि नात गॅलरीमध्ये बसले. थंडगार वार सुटलेलं. तिने आजोबांना अमेरिकेतील अनेक गोष्टी सांगितल्या. आजोबादेखील कुतूहलाने ऐकत होते. तिने आजोबांना विचारलं, “आजोबा तुम्ही हॉलमध्ये,बेडरूम मध्ये महाराजांची फ्रेम का लावली ?, तुम्ही इतकं वाचन करता, बुक्स देखील आहेत मग फ्रेम लावावीच असं का वाटलं तुम्हाला ?” आजोबा किंचित हसले. डोळ्यावरील चष्मा काढून ठेवला आणि म्हणाले,
“ऐक, छत्रपती म्हणजे संघर्ष, छत्रपती म्हणजे सळसळती ऊर्जा, छत्रपती म्हणजे चहू बाजूंनी माणूस अडकला की पुढचं पाऊल टाकण्यासाठी मिळणारी प्रेरणा. तुझी आजी जाऊन दहा वर्षे झाली. या घरात मी एकटा राहतो. सतरा विचार मनात येतात. एकटं एकटं वाटतं. तुम्ही म्हणता अमेरिकेला या पण मला तिथे थोडीच करमेल. मी वाचन करतो. एकटाच या बाल्कनीत बसतो. स्वयंपाक करणारी बाई दोन टाईम येऊन स्वयंपाक बनवून जाते. घर खायला उठतं. पण जेव्हा जेव्हा मला गिव अप करू वाटतं, सगळं काही सोडू वाटतं तेव्हा हॉलमध्ये मला दिसते ती महाराजांची प्रतिमा, बेडरूम मध्ये विचार करत बसतो तेव्हा समोर फ्रेम दिसते ती छत्रपती संभाजी महाराजांची. त्या नाजूक क्षणी त्यांना पाहणं या म्हाताऱ्याच्या अंगात नवीन बळ देतं. अर माझ्या राजानं उसळत्या सागरात घोडा फेकला….”
आजोबा ताडकन उभे राहिले. तिने त्यांचा डोळ्यात पाहिलं ते तेज. तिच्या अंगावर काटा आला. वाटलं या ७२ वर्षाच्या म्हाताऱ्या माणसात ऊर्जा निर्माण करणाऱ्या माणसांबद्दल वाचायलाच हवं. तिने बुकशेल्फ उघडलं आणि पुस्तकाचं पहिलं पान पलटलं, पुढे पाने पलटत गेली, ती वाचत राहिली. रात्र सरून पहाट झाली…
– अभिनव ब. बसवर