मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास लोकांपर्यंत सिनेमाच्या माध्यमातून पोहोचवण्याच्या ध्येयाने पेटलेल्या दिग्दर्शक आणि लेखक दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी ‘जंगजौहर’ सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. योगायोग म्हणजे ३६० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी १३ जुलै १६६० रोजी बाजीप्रभूंनी आणि बांदलसेनेच्या वीरांनी पावनखिंडीत स्वराज्यासाठी रक्ताचा रणआक्रोश आणि मराठ्यांचं रणांगणातील सामर्थ्य दाखवलं होतं.
आजच्या दिवसाचं महत्व साधून ‘जंगजौहर’चा टीझर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे. या टीझरला अल्पावधीतच प्रेक्षकांचा उडंद प्रतिसाद मिळाला असून सोशल मीडियावर हा टीझर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याआधी दिग्पाल यांचं लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या फर्जंद आणि फस्तेशिकस्त या सिनेमांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सरदार कोंडाजी फर्जंद यांनी मूठभर मावळ्यांच्या मदतीने पन्हाळा किल्ला काबीज करण्यासाठी दिलेल्या झुंजीची संघर्षमय गाथा दिग्दर्शक ‘फर्जंद’ सिनेमाच्या माध्यमातून मांडली होती. तसेच शाहिस्तेखानावरील हल्ला म्हणजे शिवशाहीतील सर्जिकल स्ट्राइकच.! याच सर्जिकल स्ट्राइकचा थरार दिग्पाल यांनी ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडला होता.
महाराष्ट्राच्या आणि शिवकाळातील अशाच शूरवीरांच्या गाथा सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याच्या ध्येयाने पेटलेले दिग्पाल लांजेकर आता बांदल सेना आणि बाजीप्रभूंनी पावनखिंडीत स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाची शूर गाथा ‘जंगजौहर’ सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीला घेऊन येत आहेत. दिग्पाल यांनी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर केली नसल्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.