बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आता केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सुशांतने १४ जुनला वांद्रे येथील त्याच्या राहत्याघरी गळफास लावून आत्महत्या केली होती. मात्र ही आत्महत्या नसून बॉलिवूड मधील बड्या माफियांच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा गेली महिन्याभर सोशल मीडियावर सुरू आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर वांद्रे पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. वांद्रे पोलिसांनी आत्तापर्यंत या प्रकरणात ३५ लोकांचे जबाब नोंदवले आहेत. ज्यात सुशांतचे वडील के. एल. सिंग, बहीण नितू सिंग, बहीण मीतू सिंग, आर्ट डायरेक्टर सिद्धार्थ पिठानी, सुशांतचे आचारी नीरज आणि केशव, केअर टेकर दीपेश सावंत, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा, बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी, पीआर राधिका निहलानी, प्रियसी रिया चक्रवर्ती, सुशांतची आधीची बायको अंकिता लोखंडे, चावी बनवणारा, मित्र महेश शेट्टी, सुशांतवर उपचार करणारे डॉक्टर केरसी चावडा, कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट प्रियांका खिमानी, सिने निर्माते संजय लीला भंसाळी, मैत्रिण रोहिणी अय्यर यांच्यासह शुक्रवारी १० जुलै रोजी पोलिसांनी बॉलिवूडमधील टॉप टॅलेन्ट मॅनेजर रेश्मा शेट्टी चाही जबाब नोंदवून घेतला. रेश्मा ही सलमान खानची एक्स मॅनेजर आहे.
सुशांतच्या आत्महत्येनंतर नेटकऱ्यांनी सुशांतच्या मृत्यूला यशराज फिल्म्स (आदित्य चोप्रा), धर्मा प्रोडक्शन (करन जोहर), टी-सिरीज् (भुषण कुमार), बालाजी टेलिफिल्म्स (एकता कपूर), नाडियडवाला फिल्म्स (साजिद नाडियडवाला), सलमान खान फिल्म्स (सलमान खान, अल्विरा खान-अग्निहोत्री) यांना जबाबदार धरलं होतं. मात्र विषेश म्हणजे पोलिसांनी केलेल्या ३५ जणांच्या चौकशीत यापैकी कोणीही करन जोहर, संजय लीली भंसाळी यांना सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं नाही. यामुळे त्याच्या आत्महत्येच्या चौकशीचा पेच अधिक वाढला आहे. त्याच बरोबर मुंबई पोलिस बॉलिवूडच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत, केंद्रिय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी केली आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांच्या मागणीला नेटकऱ्यांनी पाठिंबा देत. ट्विटरवर #SSRCaseIsNotSuicide ट्विटरवर ट्रेंड करायला सुरूवात केली आहे. सुशांतच्या फॅन्सना सुशांतचा मृत्यू जिव्हारी लागला असून सुशांतच्या मृत्यू पासूनच #JusticeForSushant या हॅशटॅगखाली सुशांतला न्याय मिळावा अशी मागणी त्याचे फॅन्स करत आहे.