मुंबई : कोरोना माहामारीच्या संकटातही अखेर महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल आज जाहीर (Maharashtra HSC Results 2020 Declared) झाला आहे. कोरोनामुळे त्रस्त असलेल्या 15 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना बारावीचा निकाल कधी लागेल या बाबत उत्सुकता होती. अखेर आज ही उत्सुकता संपली असून महाराष्ट्र बोर्डाच्याhttp://mahresult.nic.in/निकाल जाहीर कऱण्यात आला आहे. यावर्षी बारावीचा निकाल 90.66 टक्के लागला आहे. मागील वर्षी हा निकाल 85.88 टक्के होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत या वेळच्या निकालात 4.78 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढलेली ही आकडेवारी महत्वाची आहे.
एकूण 12, 81, 712 विद्यार्थी उत्तीर्ण तर यावर्षीही निकालात मुलींचीच बाजी…
बारावीच्या परीक्षेला पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य आणि एचएसची व्होकेशनल या शाखांमधील एकूण 14, 20, 575 नियमित विद्यार्थ्यांनी आपलं नाव नोंदवलं होतं. त्यापैकी 14, 13, 687 विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले. या 14, 13. 687 विद्यार्थ्यांपैकी 12, 81, 712 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 90.66 टक्के इतकी आहे. तसेच यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यातील सर्वच विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 93.88 टक्के इतका आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल 88.04 टक्के आहे. म्हणजेच विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 5.84 टक्क्यांनी जास्त आहे.
कोकणाची बाजी तर औरंगाबादचा निकाल सर्वात कमी…
बारावीच्या निकालात यंदाही नेहमीप्रमाणे कोकणाने बाजी मारली असून विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 95.89 टक्के इतकी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर 92.50 टक्यांसोबत पुण्यानेही बाजी मारली आहे. तर यंदा औरंगाबाद विभागाचा निकाल हा सर्वात कमी म्हणजेच 88.18 टक्के इतका लागला आहे. कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल आहे चला पाहुया…
विभागनिहाय निकाल
कोकण – 95.89
पुणे – 92.50
कोल्हापूर -92.42
अमरावती – 92.09
नागपूर – 91.65
लातूर – 89.79
मुंबई – 89.35
नाशिक – 88.87
औरंगाबाद – 88.18
39.03 टक्के रिपीटर पास तर 26 विषयांचा निकाल 100 टक्के…
राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून या परीक्षेसाठी सर्व शाखांमधील एकूण 86, 739 विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 86, 341 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामधील 33, 703 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी 39.03 टक्के आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 93.57 टक्के लागला आहे. बारावीसाठी एकूण 154 विषयांची परीक्षा घेण्यात आली, त्यामध्ये 26 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.