ठाणे | श्रावण सुरू होण्यापूर्वी आषाढातला शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या अथवा दिव्यांची आवस. हिंदू धर्मात श्रावण महिना पवित्र मानला गेला आहे. बहुतांश लोक पुण्यप्राप्तीसाठी श्रावणात उपवास करतात. त्याआधी शेवटच्या दिवशी मद्यपान आणि मांसाहार करून मन तृप्त करण्याची प्रथा गेल्या काही वर्षात सुरू झाली आहे. याच कारणाने हा दिवस गटारी या नावाने लोकप्रिय आहे. गेले काही वर्षात गटारी साजरी करणे म्हणजे शहराजवळ निसर्गरम्य वातावरणात, जंगल ओढे धबधबे अशा वाहत्या पाण्याजवळ जाऊन दारू पिणे, टोळक्याटोळक्यांनी जाऊन धांगडधिंगा घालणे, आणि त्याचे फोटो सोशल मिडीयावर ‘बघा आम्ही गटारी कशी साजरी केली’ अशा प्रकारे झळकावणे हा फंडा लोकप्रिय आहे. गेली काही वर्षं शहराजवळच्या जंगलांना ह्या अनिष्ट प्रकाराचा मोठा फटका बसत असून प्लास्टिकच्या, दारूच्या बाटल्या, थर्मकोलसारखा निसर्गात विघटन न होणारा कचरा जंगलात इतस्ततः दिसून येतोय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, त्याचीच ठाण्याकडील मागची बाजू असलेलं येऊरचं जंगल ह्या अनिष्ट प्रकाराला बळी पडत होतं.
५ वर्षांपुर्वी येऊरच्या जंगलात परिस्थिती गंभीर होती. जंगलाजवळ वाढणाऱ्या शहराला कसलाही पायबंद नसल्यामुळे जंगलात मिळेल तिथून लोकं आत घुसायचे. विकेंडस् ना खाणंपिणं, मौजमजा करायला हक्काचं ठिकाण बनल्याने येऊरच्या जंगलामध्ये जाणाऱ्या प्रत्येक पायवाटेच्या बाजूला,मोकळ्या जागेत भयंकर प्लास्टिकचा, थर्माकोलचा कचरा जमा व्हायचा. पावसाळ्याच्या चार महिन्यात तर येऊर परिसरात हुल्लडबाजीला ऊत यायचा. जंगलभर विखुरलेलं प्लास्टिक ,दारूच्या बाटल्यांचे तुकडे यामुळे इथल्या वन्यजीवांच्या अस्तित्वाला मोठा धोका निर्माण झाला होता. सरपटणारे जीव या काचांचा शिकार बनत होते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणीच काहीच करत नव्हते. हे सगळं पाहून उद्विग्न होऊन वन्यजीव फोटोग्राफी करणाऱ्या काही तरुणांनी येऊरच्या जंगलासाठी सकारात्मक आणि विधायक काम करायला सुरुवात करायची या उद्देशाने ग्रीन गटारीची कल्पना अमलात आणायचे ठरविले. कसलाही पूर्वानुभव नसल्याने समविचारी संघटनांना एकत्र घेत येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्या बॅनरखाली स्वच्छता मोहिमेपासून सुरुवात केली. पाच वर्षापूर्वी सुरू केलेली ही ग्रीन गटारी मोहीम याही वर्षी उत्साहाने साजरी होतेय.
येऊर एन्व्हायरमेंट सोसायटीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर ,पाच वर्षांनी येऊरच्या जंगलाच्या परिस्थितीत अभूतपूर्व सुधारणा झाली असून जंगल परिसरात प्लास्टिक किंवा बाटल्या अभावानेच दिसतात. पोलिसांच्या कारवाईच्या धडाक्यामुळे गटारीनिमित्त जंगलात पार्ट्या झोडायला येणाऱ्या हजारो पर्यटकांची १००% नाकाबंदी झाली आहे. जंगलात अविघटनशील कचरा जमण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालय. पार्ट्या बंद झाल्याने जंगलात पुन्हा एकदा नैसर्गिक शांतता नांदू लागलीय म्हणून सजीवसृष्टी आनंदात आहे याचे अतीव समाधान येऊर एन्व्हायरमेंट सोसायटीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतय.
यावर्षी, कोविड च्या पार्श्वभूमीवर YES च्या कार्यकर्त्यांनी सामाजिक भान राखत येऊरच्या गस्तीमध्ये भाग न घेण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. परंतु गेल्या ५ वर्षांच्या मोहिमेत खंड पडू नये म्हणून अतिशय अभिनव पद्धतीने पर्यवरण संवर्धन व संरक्षणाच्या जनजागरणासाठी तसेच तरुणाईचे ध्यान या गोष्टींकडे आकर्षित करण्यासाठी एक रॅप गाणे प्रसिद्ध केले आहे. *येऊर की आवाझ* असे गाण्याचे नाव असून त्याची निर्मिती हिरण्यगर्भ सेवा संस्थेने केली आहे. गायक ऋतुराज सावंत रॅपर आहेत तर आदित्य सालेकर (डायरेक्टर), मयुरेश हेंद्रे (एडिटर), अक्षय केनी (कॅमेरा आणि सिनेमतोग्रफी) , पार्थ चव्हाण (एरियल सिनेमतोग्रफी) , अक्षय मांधरे (गो प्रों. सिनेमतोग्रफी) , सुमेध अडसूळ (मिक्स & मास्टर), आदित्य सालेकर आणि मयुरेश हेंद्रे (विल्लाइफ फुटजेस), प्राची शेट्ये, विनय जैस्वाल, प्रिन्स डिसुझा, अजिंक्य जाधव यांचे महत्वाचे योगदान आहे.
या गाण्याचे अधिकृत लोकार्पण जागतिक कीर्तीचे कलाकार, कवी, संगीत दिग्दर्शक पियुष मिश्रा यांच्या तर्फे करण्यात आले
याचबरोबर येऊर -ग्रीन लंग्स ऑफ ठाणे या माहितीपटाची सुद्धा निर्मिती हिरण्यगर्भ सेवा संस्था ह्यांच्या कडून करण्यात आली आहे. येऊर परिसरातील समस्या आणि त्यावर उपाय शोधत येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्या माध्यमातून गेले पाच वर्षे सुरू असलेले उपक्रम असे या महितीपटाचे स्वरूप आहे. प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते स्टॅलिन दयानंद, रोहित जोशी, अपूर्वा आगवण तसेच येऊर येथील वायुसेना दलातील निवृत्त कॅप्टन तरुण गौतम तसेच स्थानिक आदिवासी किशोर म्हात्रे, अनिता वळवी आणि इतर स्थानिक लकप्रतिनिधींनी याविषयीच्या भावना महितीपटात विषद केल्या आहेत. या महितीपटाची निर्मिती हिरण्यगर्भ सेवा संस्था ह्यांनी केली असून ठाणेकर तरुणाई आदित्य सालेकर ह्यांनी ह्या डॉक्युमेंटरी ला डायरेक्ट केले आहे व मयुरेश हेंद्रे यानी त्याला एडीट केले आहे आहे. दोन्ही आदित्य आणि मयुरेश Yeoor Environmental Society चे संस्थापक सदस्य आहेत व मागच्या ५ वर्षा पासून सातत्याने येऊर साठी नावीन्य पूर्ण उपक्रमत सहभाग घेण्यात साथ देत आहेत.
येऊर एन्व्हायरमेंट सोसायटीच्या सोबत हिरण्यगर्भ सेवा संस्था, होप, वण शक्ती, वाइल्डलाइफ वेलफेअर असोसिएशन, म्युज, Aarey Conservation Group, Earth Kids Humanity Foundation, Paryavaran Dakshata Manch, सेवेचे ठायी तत्पर, Let India breath, Aarey Forest, Thane Matadata Jagran Abhiyan, Empower Foundation, Universal Reach Foundation, We the People, Artist with Animals, Aarey Forest या संस्थांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. ठाणे वनविभाग आणि वर्तकनगर पोलीस स्टेशनचा पुर्ण पाठींबा या ग्रीन गटारीच्या आयोजनाला होता.