पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोहतांग येथे 3 ऑक्टोबर 2020 रोजी अटल बोगद्याचे उद्घाटन होणार आहे.
तो 9.02 किलोमीटर लांबीचा महामार्गावरचा जगातला सर्वाधिक दीर्घ बोगदा आहे.
आठ मीटर रूंदीचा दुपदरी मार्ग त्यामध्ये तयार केला गेला आहे. बोगद्याची उंची 5.525 मीटर ठेवण्यात आली आहे. बोगद्याची एकूण रूंदी 10.5 मीटर असून त्यामध्ये 3.6 गुणिले 2.25 मीटरचा आपत्तीकाळासाठी अग्निरोधक बोगदा मार्ग तयार करण्यात आला आहे.
प्रतिदिनी 3000 गाड्या आणि 1500 मालमोटारी ताशी 80 किलोमीटर गतीने या बोगद्यातून वाहतूक करू शकणार, अशा पद्धतीने तो तयार करण्यात आला आहे.
या बोगद्यामध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रोमेकॅनिल प्रणाली तसेच हवा खेळती राहण्यासाठी सर्व व्यवस्था, SCADA नियंत्रक अग्निरोधक प्रणाली बसविण्यात आली आहे.
सुरक्षा व्यवस्थेमध्ये, प्रत्येक 150 मीटरवर संपर्क यंत्रणा, प्रत्येक 60 मीटरवर अग्निशमन यंत्रणा, प्रत्येक 250 मीटरवर CCTV, स्वयंचलित घटना शोध प्रणाली, प्रत्येक एक किलोमीटरवर बोगद्यामधल्या हवेची गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा, प्रत्येक 50 मीटरवर अग्निशमनासाठी सुविधा, प्रत्येक 60 मीटरवर कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
हा बोगदा मनाली ते लाहौल-स्पिती या शहरांना जोडतो. लाहौल स्पितीच्या संपूर्ण खोऱ्यात हा बोगदा तयार करण्यात आला आहे. या भागामध्ये होणाऱ्या हिमवर्षावामुळे लाहौल स्पितीच्या पुढच्या भूप्रदेशाला जवळपास सहा महिने उर्वरित देशाबरोबर संपर्क साधणे शक्य होत नव्हते.
हिमालयी पर्वतरांगांमध्ये समुद्र सपाटीपासून 3000 मिटर (10,000 फूट) उंचीवर असलेल्या पिर पंजाल येथे हा बोगदा तयार करण्यात आला आहे.
या बोगद्यामुळे मनाली ते लेह या शहरांमधले 46 किलोमीटरचे अंतर कमी झाले आहे. अतिउंचीवरच्या डोंगराळ भागामुळे अवघे 46 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनांना 4 ते 5 तासांचा कालावधी लागत होता.सीमा मार्ग संघटनेच्यावतीने (BRO) हा अतिउंचीवरचा डोंगराळ भौगोलिक प्रदेशामध्ये बोगदा तयार करण्यात आला.