तो एक तळपता तेजस्वी तारा तीन वर्षापूर्वी अचानकपणे नाहीसा झाला आणि हजारो हृदयांच्या सिंहासनावर विराजमान असणारा मुर्तीमंत इतिहास काळाच्या पडद्याआड पुन्हा त्याच इतिहासात इतिहास जमा झाला. गडकिल्ल्यांचा हा प्रहरी असलेला दुर्गमहर्षी अवलिया संशोधक आणि अभ्यासकांना पोरकं करून गेला. तो तेजस्वी तळपता सूर्य म्हणजे आपल्या सर्वांचे हृदयस्थ दुर्गमहर्षी प्रमोद मांडे (भाऊ) होत. भाऊ खरं सांगायचं तर तुम्ही शरीराने गेलात पण आमच्या हृदयातून कसे जाल. तिथे तर तुम्ही सदैव अस्तित्व करून आहात...! दिवाळी आली की तुमची स्मृती आमच्या अंतःकरणात अधिक गहिरी होत जाते. हयात असताना प्रत्येक दिवाळी तुम्ही गडकिल्ल्यांच्या सानिध्यात साजरी केली आणि ऐन दिवाळीतच तुम्ही परतीच्या वाटा बंद असलेल्या गडावर कायमचे निघून गेलात कधीही परतून न येण्यासाठी..! आम्हा सर्वांच्या सहवासाचा एवढा कंटाळा आला होता की खुद्द छत्रपतींना तुमच्याकडून गडकिल्यांच्या संदर्भात चर्चा करावीशी वाटली म्हणून यायचं टाळलंत... ! सारे हवालदिल झाले आहेत .तुमच्या सहवासात दगडांनाही पाझर फुटलेले आम्ही पाहिलेय...! खरं तर ते सारे दगड म्हणजे आम्हीच.... तुमचे मानसपुत्र म्हणा हवं तर...! तुमच्याशी जोडलेले सारे तरूण तुमचे मनसपुत्र आहेत. तुम्ही आमच्या आग्रहाखातर तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर लिहायला घेतलं खरं पण विधात्याने तुमच्या श्वासांवर नियंत्रण आणलं आणि सारं काही जागच्या जागी थांबलं पण तुमच्या नंतर मानसपुत्रांनी लिहायला सुरूवात केली आहे कित्तेकजण आपल्या सांगण्याने हाती लेखणी धरून इतिहास संशोधनातील तुमची नज़र आत्मसात करत लिहिते झाले आहेत. लिहिलेली सारी पुस्तके ही तुम्हाला समर्पित करण्यास त्यांनी सुरुवात सुद्धा केली आहे. भाऊ तुम्ही पेरलेलं रान आता उगवून यायला लागलंय पण ते बहरलेलं रान पहायला तुम्ही इथे नाही आहात. भाऊ तुमच्याकडे खंत व्यक्त करावीशी वाटली तरी ती करता येत नाही. तुम्ही विविध विचारधारांची माणसं एकत्र आणली.आपसात प्रेम जिव्हाळा निर्माण केला.मायेचा तो ओलावा अजूनही कित्तेकात तसाच जम धरुन टिकून आहे तो ओलावा कधीही संपू नये अशी कळकळ व्यक्त करावीशी वाटते. आपल्या साक्षीने ही आमच्यामधे मैत्रीची बाग फुलली आहे. ती अशीच बहरत रहावी .
भाऊ तुमच्या सानिध्यात तुम्ही सांगितलेला इतिहास आणि क्रांतीकारी देशभक्तांचा विचार देशभर प्रचारीत आणि प्रसारीत करण्याचा प्रयत्न होतोय.त्यासाठी तुमचे आशिर्वाद हवे आहेत. म्हणूनच तुमच्या स्मृतिदिनी तुमच्याच नावे पुरस्कार द्यायला आम्ही सुरूवात केली आहे. तुम्ही या कार्यक्रमास यावं आपल्या उपस्थितीत हा सोहळा पार पडावा यासाठी तुम्हाला सांगावं तरी कसं हा प्रश्न पडतो. हयात असतानाही तुम्ही कधीही औपचारिकता पाळली नाही. कधीही दुर्गपीठावर स्वतःहून जाऊन बसला नाहीत पण यावेळी नक्की या..! स्वरभास्कर पं.भिमसेन जोशी नाट्यगृहात पुरस्काराच्या दुर्गपीठावर छत्रपतींच्या मुर्तीशेजारी पण थोडी खाली असलेल्या जागेवर तुमच्यासाठी बसण्याची व्यवस्था तयार ठेवली आहे . तुम्ही येणारंच आहात अगदी नेहमीप्रमाणे वेळेआधी तुम्ही सुक्ष्मदेहाने तिथे उपस्थित झालेला असाल हा विश्वास आम्हाला आहे.
तुमची ही मुलं अगदी तुम्ही दिलेल्या विचारांवर वाटचाल करत पुढे चालली आहेत त्यांच्यावर आपल्या आशिर्वादाचं आणि आधाराच छत्र धरण्यासाठी तुम्ही नक्कीच तिथे सुक्ष्म देहाने उपस्थित असणार आहात हे नक्की….
लेखक – संतोष घुले. (इतिहास संशोधक व साहित्यिक)