बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल नाटकाचा प्रयोग पुणे येथील आनंदोद्भव नाट्यगृहात झाला.आणि त्याला आधुनिक अर्थाने नाटक म्हणता येईल असा नाट्यप्रयोग प्रथम रंगभूमीवर अवतरला.
याआधी मराठी नाटके नाट्यगृहात दाखवली जात. परंतु त्याचे स्वरूप अगदी निराळे असे. पौराणिक कथा भाग निवडून मुख्य भर वेडेवाकडे हातवारे, उड्या, युद्ध इत्यादीवरच भर असे.
अण्णासाहेबांनी प्रथमच सर्व पात्रांचे संभाषण व पदांसहित नाट्यसंहिता लिहून काढली. त्याबरहुकूम तालमी घेऊन संपूर्ण सुसंवादी नाट्यात्मक कथानक सादर केले गेले. या नाटकाने मराठी नाट्य संस्कृतीच्या साहेब इतिहासात क्रांती केली आणि संगीत रंगभूमीचे समृद्ध दालन महाराष्ट्रात खुले झाले.