बळवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म 31 मार्च 1843 मध्ये धारवाड जिल्ह्यातील गुर्लहोसुर या गावी झाला. बाराव्या वर्षापर्यंत घरीच कानडी व मराठी भाषांचे शिक्षण घेतले. पुढील शिक्षण धारवाड, कोल्हापूर व पुणे येथे घेतले. पुण्यात असताना नाटक मंडळींना पदे रचून देऊ लागले. त्यातून नाटकाची आवड वाढीस लागून स्वतःची नाटक मंडळी काढली. पुढे विविध प्रकारच्या नोकऱ्या केल्या.
1880 साली पुणे येथे एका पारशी नाटक मंडळीचे ऑपे राच्या धरतीवरील एक नाटक पाहून त्या धर्तीवर कालिदासाच्या ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ या नाटकाचे मराठी भाषांतर करून नवीन पदे घालून रंगभूमीवर आणले. या नाटकाचे उत्तम यश व लोकप्रियता मिळाली.
1880 मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळीत स्थापन केली. संगीत सौभद्र हे त्यांचे स्वतंत्र नाटक सर्वकाळ लोकप्रिय ठरले आहे. रामराज्य वियोग हे त्यांचे शेवटचे नाटक.
सुसंघटित कथानक, आकृत्रिम संवाद, विलोभनीय व्यक्तिरेखा, प्रासादिक पदे आणि नाट्यपरोधी विनोदाचा जरा यामुळे अण्णासाहेब आजही मराठीतील श्रेष्ठ संगीतकार मानले जातात. ते कीर्तनाची अख्यानेही रचून देत. शीघ्र कवित्व त्यांच्या ठाई होते. दक्षिणा प्राईज कमिटीच्या स्पर्धेसाठी शिवाजी महाराजांवर पाचशे आर्यांचे एक दीर्घकाव्य त्यांनी रचले होते. त्यांच्या सर्व लेखनाचा संग्रह ‘समग्र किर्लोस्कर’ नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे.