दिवाळीच्या दिवसात नागरिकांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जनतेला केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला जनतेबरोबर अनेक कलाकार मंडळीतूनही समर्थन मिळत आहे. त्याचबरोबर करोडो भारतीयांच्या मनावर राज्य करणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला समर्थन दिले आहे. लतादीदींनी सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना, राज्यातील जनतेला फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. फटाके फोडण्याऐवजी दिवे लावून दीपोत्सव साजरा करावा, असे लतादीदी म्हणाल्या.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना टेलिव्हिजनवर जे सांगितलं, त्याची आपण अंमलबजावणी करणे खूप आवश्यक आहे, असं मला वाटते. दिवाळीत कमीत कमी फटाके फोडूया. प्रदूषण टाळूया. सर्वांनी प्रकाशपर्व, दीपोत्सव साजरा करूया. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचं आहे. सर्वांनी मास्क अवश्य वापरावा, असेही लतादीदी म्हणाल्या.