मुंबई | सद्गुरु सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कला, क्रीडा, शिक्षक, सामाजिक कार्य, पत्रकारिता, वैद्यकीय, उद्योग, साहित्य या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना चांदीचं स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
दरम्यान, यासंदर्भात मंत्रालयात पूर्वनियोजन बैठक झाली. याप्रसंगी कार्यक्रमाची रुपरेषा ठरवण्यात आली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे १५ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी २ वाजता हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रक वनमंत्री संजय राठोड असून या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, कृषीमंत्री दादाजी भुसे, परिवहन मंत्री अनिल परब, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. अशी माहिती विशेष कार्य अधिकारी निलेश राठोड यांनी दिली आहे.